ब्रेक द चेन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:06 AM2021-05-15T04:06:51+5:302021-05-15T04:06:51+5:30
लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर ...
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. मात्र ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूही ऑनलाईन विकत आहेत ,सरकारच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे. याबाबत तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे दुकानदार संघटना न्यायालयात जाणार आहे.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह म्हणाले की, वाढते कोरोना रुग्ण पाहता महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाउन लावले आहे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेत मात्र अत्यावश्यक नसणाऱ्या दुकानांना टाळे लावण्यात आले आहे. असे असताना ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक मालासोबत अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूही विकत आहेत. यामुळे दुकानदारांचा माल पडून राहुन किरकोळ विक्रेते उद्ध्वस्त होतील. याबाबत सरकारकडे तक्रार केली आहे पण कारवाई होताना दिसत नाही.
राज्यात १३ लाख दुकाने असून ४ एप्रिल ते ३१ मे या दरम्यान सर्व दुकानांचे ६९५०० कोटीपर्यंत नुकसान होऊ शकते.ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूही ऑनलाईन विकत आहेत . राज्य सरकारच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे, त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून त्या कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहोत.