मुंबई : कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या करवीर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला. शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच काँग्रेस ४८ जागांवर लढत असेल तर सात जागांवर पाठिंबा देऊ असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच आंबेडकर यांनी केली. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती, नाही तर युती नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच ॲड. आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत त्यांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातही आमची ताकद आहे.
काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. सर्वांचे जमले नाही तर प्रत्येकाला ४८ जागा लढवाव्या लागतील. त्यामध्ये काँग्रेस ४८ जागा लढत असेल तर ७ जागांवर पाठिंबा देऊ असेही त्यांनी नमूद केले. आम्हाला चार जागांचा प्रस्ताव कधीच दिला गेला नाही. अकोल्यासह फक्त तीन जागा देण्यात आल्याचे ते म्हणाले.
२६ मार्चला निर्णय घेणारआघाडीबाबत आंबेडकर म्हणाले, त्यांचाच तिढा सुटत नाही. मग आमची एन्ट्री करून काय करायचं? आम्ही २६ तारखेपर्यंत थांबू, त्यानंतर निर्णय घेऊन भूमिका जाहीर करू. आम्ही एक पत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सात जागांवर एकमत झाले तर बरे होईल. आम्ही नंतर निर्णय घेऊ.
तिसऱ्या आघाडीची चर्चाओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आंबेडकर यांची त्यांच्या राजगृह या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शेंडगे यांनी लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी होईल आणि आणि राज्यात राजकीय भूकंप राज्यात होईल असे भाकित केले. ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र ताकतीने लढतील. आम्ही २२ जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. आमच्याकडे यादीदेखील तयार आहे, असे शेंडगे म्हणाले. यावर आंबेडकर यांनी शेंडगे यांनी नवीन पक्ष सुरू केला आहे. आमचेच घोंगडे भिजत पडले आहे. ते अंतिम झाल्याशिवाय तुमच्याशी चर्चा करू शकत नाही, असे सांगितल्याचे स्पष्ट केले.