‘रॅन्समवेअरमुळे नव्हे तर नोटा टंचाईमुळे एटीएम बंद!’
By admin | Published: May 16, 2017 03:01 AM2017-05-16T03:01:56+5:302017-05-16T03:01:56+5:30
रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून पुरेशा नोटा पुरवण्यात येत नसल्याने राज्यातील बहुतांश एटीएम सेवा बंद आहेत. मात्र सिस्टीम अपडेटसाठी मुंबईसह देशातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून पुरेशा नोटा पुरवण्यात येत नसल्याने राज्यातील बहुतांश एटीएम सेवा बंद आहेत. मात्र सिस्टीम अपडेटसाठी मुंबईसह देशातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद राहणार असल्याच्या अफवेने सोमवारी ग्राहकांमध्ये खळबळ उडाली.
बँकांना सिस्टीम अपडेट करण्याचे कोणतेही आदेश रिझर्व्ह बँकेने दिले नसल्याचा दावा बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी केला. तथापि, बँक आॅफ इंडियाच्या एका पदाधिकाऱ्याने देखील याला दुजोरा दिला. तर बँक आॅफ महाराष्ट्रच्या एका बड्या अधिकाऱ्यानेही सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश ही केवळ अफवा असल्याचे सांगितले.
यासंदर्भात उटगी म्हणाले की, गोपाळकृष्ण समितीने केलेल्या शिफारशींनुसार प्रत्येक बँकेचे वॉररूम दररोज बँक आणि एटीएम सेवेमधील आयटी क्षेत्राशी संबंधित सुरक्षेचा आढावा घेत असते. देशातील बँका आणि एटीएम सेवा सुरक्षित असून त्यासंदर्भात आढावा बँकेचे वॉररूम रोज घेत असल्याचा दावाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
‘रॅन्समवेअर’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अपडेटसाठी एटीएम सेवा बंद राहणार, ही अफवा आहे. मुळात नोटांच्या टंचाईमुळे मार्च महिन्यापासूनच राज्यातील एटीएम सेवा कोलमडलेली आहे. नोटा टंचाईमुळेच एटीएम बंद राहणार आहेत. याचा त्रास काही प्रमाणात ग्राहकांना होणार आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर बँकांना एटीएम सेवा अपडेट करण्यासंदर्भातील कोणताही आदेश नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहकांनी उगाच एटीएमबाहेर रांगा लावून अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही उटगी यांनी केले आहे.