मुंबईत एकही इमारत धोकादायक नाही; दगडी चाळीत उभा राहणार आता दगडी टॉवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:36 AM2021-05-20T09:36:03+5:302021-05-20T09:37:24+5:30
दगडी चाळ पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने स्वीकारला
मुंबई : ज्या दगडी चाळीने भायखळ्याला ओळख मिळवून दिली त्या दगडी चाळीचा लवकरच दगडी टाॅवर हाेऊ शकताे, कारण दगडी चाळ पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने स्वीकारला आहे.
दगडी चाळीत दहा इमारती उपकर प्राप्त (सेस) आहेत. चाळीने इमारतींच्या पुनर्विकासासाठीची परवानगी म्हाडाकडे मागितली आहे. म्हाडाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. तो वॉर्डकडे जाईल. त्यानंतर भाडेकरूंची पात्रता निश्चित करुन पुढे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्याननंतर काम सुरू होईल.
दगडी चाळीत दहा इमारती असून यातील आठ इमारती अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळी यांच्या आहेत. दरम्यान, मान्सनपूर्व काळात तयारी म्हणून म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. चार झोन असून सध्या १४ हजार ७५५ सेस इमारती आहेत. यंदा ९ हजार ४८ इमारतींचे सर्वेक्षण झाले असून एकही धोकादायक इमारत सापडली नाही. यापुढेही सर्वेक्षण सुरूच राहणार असून धोकादायक इमारती नजरेस पडल्यास आम्हाला माहिती द्या, असे आवाहन ठेकेदारांना केले जाणार आहे. पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडू नये यासाठी म्हाडाने मान्सूनपूर्व तयारी केली आहे. ताडदेव येथे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. येथे तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी काम करतील.
म्हाडाने चार झोनमध्ये ठेकेदार नेमले आहेत. ते अपघात घडण्याची भीती असल तर सुरक्षा, उपाययोजना हाती घेण्यात येतील. अनेक कर्मचारी निवृत्त होत असल्याने मनुष्यबळ कमी आहे. म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एखादी इमारत खाली करावी लागल्यास तेथील नागरिकांसाठी संक्रमण शिबिर तयार आहेत.
यंत्रणा सक्षम; कांदिवलीत १३५ संक्रमण शिबिरे राखीव
गेल्या वर्षी ज्या १८ धोकादायक इमारती होत्या त्यांचे काम सुरू आहे. मालक, भाडेकरूंनी मदत केली पाहिजे. मग धोका आणखी कमी होईल. म्हाडाला इमारत दुरुस्तीत यश आले. त्यामुळे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती आढळल्या नाहीत. ६८ टक्के सर्वेक्षण झाले आहे. पावसाळ्यात काम थांबणार नाही. यंत्रणा सक्षम आहे. कांदिवली येथे १३५ संक्रमण शिबिरे राखीव ठेवली आहेत. - विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, म्हाडा
दहा इमारती उपकरप्राप्त
दगडी चाळीतील दहा इमारती या उपकरप्राप्त (सेस) आहेत. चाळीने इमारतींच्या पुनर्विकासासाठीची परवानगी म्हाडाकडे मागितली आहे. म्हाडाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. दगडी चाळीत दहा इमारती असून यातील आठ इमारती अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळी यांच्या आहेत.