जुन्या तारांचा भार सोसवेना! भारनियमन टळेना... दुरुस्तीचा खर्च करणार कोण?
By सचिन लुंगसे | Published: April 19, 2024 08:56 AM2024-04-19T08:56:14+5:302024-04-19T08:57:24+5:30
उन्हाळझळांमध्ये विजेच्या लपंडावाला पाच दशकांचा भार कारणीभूत, राज्य जातेय अंधारात, दुरुस्तीचा खर्च करणार कोण?
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एप्रिलच्या मध्यालाच तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेल्याने उष्णतेची तीव्र लाट आली. त्यामुळे साहजिकच घरोघरी पंखे, कूलर, एसी अव्याहत सुरू राहिल्याने वीजपुरवठ्याने मान टाकली. त्याची परिणती भारनियमनात झाली. परिणामी उष्णतेची लाट सोसणाऱ्या वीजग्राहकांना घाम टिपण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय उरला नाही. ऐन उन्हाळ्यात भारनियमन करण्याला ५० वर्षांहून अधिक काळ वापरल्या जाणाऱ्या तारांचे जाळे कारणीभूत असल्याचे समजते.
दोन लाख किमी लांबीच्या या तारांची वीजवहनाची क्षमता संपली असल्याने त्यांना अतिरिक्त भार सोसवत नाही. त्यामुळे वारंवार भारनियमन करावे लागत आहे. यावर उपाय म्हणून वीज वाहून नेणाऱ्या तारांची क्षमता वाढविणे, देखभाल दुरुस्ती करणे किंवा तारा बदलणे हा उपाय असला तरी याचा खर्च कोणी करायचा ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
ठाणे, कळवा, नवी मुंबई येथे बुधवारी तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडित झाला. महापारेषणमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात ५० ते ६० वर्षांपूर्वी वीज वाहून नेणाऱ्या तारा टाकल्या आहेत. या वाहिन्या नव्याने टाकण्याची गरज आहे. राज्यभरातील वाहिन्या बदलण्यासाठीचा खर्च हजारो कोट्यवधींच्या आसपास आहे. या वाहिन्या बदलण्याचा खर्च राज्य सरकारने केला पाहिजे. मात्र, वीज कंपन्या तोट्यात असल्याने राज्य सरकार यावर काहीच भूमिका घेत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
जमिनीखालून किंवा जमिनीवरून गेलेल्या जुन्या वीज वाहिन्यांची अतिरिक्त क्षमता आहे की नाही? हे तपासले पाहिजे. वाढीव वीज वाहून नेण्यासाठी आता अतिरिक्त वीज वाहिन्यांची गरज आहे. त्याची देखभाल दुरुस्ती करून त्याची क्षमता वाढविली पाहिजे. हे होत नसल्याने बिघाड होत आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात परिसरनिहाय हे तपासले पाहिजे. - अशोक पेंडसे, वीज तज्ज्ञ
मुंबईत वीज कशी येते ?
मुंबईबाहेरून सात वीज पारेषण वाहिन्यांद्वारे मुंबईत वीज वाहून आणली जाते. या वाहिन्यांवरून सुमारे २८०० मेगावॉट वीज वाहून आणली जाते, तर उर्वरित वीज चेंबूर आणि डहाणू येथे निर्माण होत असून, ही वीज मुंबईतूनच वाहून आणली जाते.
का वाढते विजेची मागणी?
तापमान वाढल्यानंतर एसी, कुलर, पंखे या वीज उपकरणांचा वापर वाढतो. मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले तरी १६० ते १८० मेगावॅटने विजेची मागणी वाढते. त्यामुळे वीज वाहिन्यांवर अतिरिक्त भार वाढतो. विजेचा हा वाढता भार वाहिन्यांवर पडल्याने यंत्रणा बंद पडतात. परिणामी वीज पुरवठा खंडित होतो.
कितीने भार वाढतो?
आता मुंबईची विजेची मागणी ३ हजार ४०० मेगावॅटवरून चार हजार मेगावॅट झाली आहे. अशावेळी वाहिन्यांवरील विजेचा भार वाढतो आहे. वाढता भार सहन करण्यासाठी वीज वाहिन्यांची क्षमता वाढण्याची गरज आहे. राज्यातील पारेषण वाहिन्यांवर विजेचा अतिरिक्त भार पडला की यंत्रणा बंद पडते. मुंबईत परिसरनिहाय ही अडचण आली की ट्रिपिंग होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो.