कुठलाही ‘कॉल’ ‘मिस’ होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:14 AM2021-02-11T01:14:34+5:302021-02-11T01:14:46+5:30

मुंबई पोलीस; ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला फोनचा शोध

No 'calls' will be 'missed' | कुठलाही ‘कॉल’ ‘मिस’ होऊ देणार नाही

कुठलाही ‘कॉल’ ‘मिस’ होऊ देणार नाही

googlenewsNext

मुंबई : प्रवास करताना फोन टॅक्सीतच राहिल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेतली.  एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तरुणीचा मोबाइल शोधून तरुणीच्या ताब्यात दिला. या वेळी “आम्ही तुमचा कुठलाही ‘कॉल’ ‘मिस’ होऊ देणार नाही,” असे म्हणत पोलिसांनी ट्विट केले.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मुंबईत ५१ हजार ६८ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद झाली. यापैकी ४० हजार ३९० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०१९ मध्ये हाच आकडा ४१ हजार ९३१ होता. 

यात हत्या (१४८), हत्येचा प्रयत्न (३४८), दरोडा (१५), सोनसाखळी चोरी (७५२), खंडणी (२०४), घरफोडी (१,६४५), वाहन चोरी (२,८०१),  दुखापत (३,८०८), दंगल (३२४), बलात्कार ( ७६७), विनयभंग (१,९४५), तर अन्य (३४,८७८) गुन्ह्यांचा समावेश आहे.

 अशात चोरीच्या ३ हजार ४३३ गुन्ह्यांची नोंद आहे. यात मोबाइल चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. यात, पोलिसांकडून मोबाइल चोरीच्या अनेक आरोपींची धरपकड करण्यात येत आहे. गुन्हे शाखेनेही अनेक आरोपींचा पर्दाफाश केला आहे. यात अनेक रहिवाशांना त्यांचे मोबाइल परत मिळवून देण्यात  आले आहेत. 

ज्येष्ठ नागरिक हाेतात सॉफ्ट टार्गेट
अशात रस्त्याने एकटे जात असलेले ज्येष्ठ नागरिकही यात सॉफ्ट टार्गेट होताना दिसत आहेत. यात, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हातून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनाही घडत आहेत. 

धूम स्टाईलने मोबाइल चोरी
अनेक प्रकरणांमध्ये धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेली टोळी मोबाइल हिसकावून पळ काढताना दिसत आहे. काही घटनांमध्ये घरातून मोबाइल चोरी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत तर कुठे नागरिकांकडून मोबाइल हरविल्याच्या तक्रारींचे प्रमाणही अधिक आहे.  

गर्दीच्या ठिकाणी मोबाइल सांभाळा
अशात गर्दीच्या ठिकाणी मोबाइल तसेच किमती ऐवज सांभाळण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. तसेच एकटे जात असतानाही काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलिसांकड़ून देण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी मुंबईत ५१ हजार ६८ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद
मोबाइल चोरीच्या संशयातून मुंबईत हत्येच्याही घटना घडल्या आहेत.

Web Title: No 'calls' will be 'missed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.