लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाषा संचालक पदासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध होत नसल्याने या पदावर उमेदवारीची शिफारस करणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगास शक्य झाले नाही, असे मराठी भाषा विभागाने मान्य केले आहे. हे नमूद करतानाच भाषा संचालक या पदाच्या विद्यमान सेवाप्रवेश नियमातील शैक्षणिक अर्हता आणि इतर तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत, अशी माहितीही दिली आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत भाषा संचालक या पदाचे काम अतिरिक्त कार्यभार नियमानुसार भाषा संचालनालयातील अनुभवी व ज्येष्ठ उपसंचालकांना देण्यात आला आहे, असाही दावा केला आहे.
२९ मे २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत भाषा संचालक या पदावर डॉ. मंजूषा कुलकर्णी या प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. ३१ मार्च २०१७ पासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन या पदाचे कामकाज चालविण्यात येत आहे. ९ डिसेंबर २०१९च्या शासनपत्रान्वये भाषा संचालक हे प्रतिनियुक्तीने भरण्याच्या अनुषंगाने जाहिरात देण्यात आली. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे भाषा संचालक हे पद प्रतिनियुक्तीने भरता आले नाही.
दरम्यान, दि. ९ मार्च २०२० रोजीच्या शासनपत्रान्वये भाषा संचालक हे पद नामनिर्देशनाने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणी पत्र सादर करण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या पदासाठी दि. २२ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्याने या पदावर उमेदवारीची शिफारस करणे आयोगास शक्य नसल्याचे दि. ५ डिसेंबर २०२२च्या पत्रान्वये कळविले आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाकडून देण्यात आली.
विलंब होत असल्याचे मान्य संचालनालयातील अनुवादकांची पदे रिक्त असल्यामुळे काही कामांना विलंब होत आहे. अनुवादकांची रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती मराठी भाषा विभागाने दिली.