मुंबईत छटपूजा आयोजनावर प्रतिबंध; कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 09:10 PM2020-11-17T21:10:53+5:302020-11-17T21:13:05+5:30
गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेचा निर्णय
मुंबई : भारतातील विविध भागात साजरे होणारे सण हे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मोठ्या उत्साहाने संबंधित समुदायांद्वारे दरवर्षी व नियमितपणे साजरे होत असतात. प्रामुख्याने उत्तर भारतीय समुदायाद्वारे साजरा होणारा छटपूजेचा सण देखील अशाच एका सणांपैकी एक सण. येत्या शुक्रवारी व शनिवारी म्हणजेच दिनांक २० व २१ नोव्हेंबर २०२० रोजी येत असलेला हा सण येत असून या सणाच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नागरिक समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. तथापि, यंदा ‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविडची दुसरी लाट येणाची असलेली शक्यता लक्षात घेऊन, तसेच समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी छटपूजा विषयक कार्यक्रमांचे आयोजन केल्यास शारीरिक अंतराचे पालन योग्य प्रकारे होईल, असे वाटत नाही; यामुळे छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणा-या आयोजनांवर नाईलाजाने प्रतिबंध घालण्यात येत आहेत.
या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी सबंधित संस्थांना सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या या महापालिकेच्या विभागस्तरावरुन देण्यात येतील. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा विविध सण साजरे करताना नागरिकांनी शारिरीक दूरीकरण पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे इत्यादीबाबत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळी देखील करावे आणि बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यानिमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
No Chhath Puja allowed at beaches, riverbanks, ponds in Mumbai: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) November 17, 2020
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार छटपुजा ही समुद्र, तलाव, नदी किनारी सूर्यास्त व सूर्योदयाच्या कालावधी दरम्यान केली जाते. सदर पूजेदरम्यान जमा होणारे निर्माल्य पाण्यात विसर्जित केले जाते. या अनुषंगाने सर्व भाविक समुद्र, तलाव, नदी किनारी जमा होतात. सद्यस्थितीत मुंबई ‘कोविड-१९’ च्या महामारीचा सामना मार्च २०२० पासून करीत असून सध्या कोविडच्या दुस-या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने तसेच दरवर्षी छट पुजेदरम्यान समुद्र किनारी होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड-१९’ चा संसर्ग रोखण्यासाठी या वर्षी छटपुजा उत्सवाच्या आयोजनाबाबत खालील उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात येत आहे:
१. समुद्रकिनारी छटपूजेस होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड – १९’ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे इ. चे पालन होणार नाही, त्यानुषंगाने समुद्रकिनारी सामूहिक छटपूजेची परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी.
२. छटपूजेसाठी सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या विभाग स्तरावरुन देण्यात येतील.
३. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी स्थानिक पातळीवर पोलिस विभागाची मदत घेण्यात यावी, तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी.
४. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विभाग स्तरावर ‘कोविड – १९’ करिता वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची चाचणी (Antigen / PCR Testing) करण्यात यावी.
५. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे.
६. अशा ठिकाणी ध्वनि प्रदूषण होऊन मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.