हॉटेल्समध्ये ख्रिसमस नाहीच!
By admin | Published: December 25, 2015 03:18 AM2015-12-25T03:18:56+5:302015-12-25T03:18:56+5:30
नाताळची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबापुरीत पंचतारांकित हॉटेल व्यवसायिकांना मात्र, ख्रिसमसच्या जल्लोषामध्ये सहभागी होता येणार नाही.
चेतन ननावरे, मुंबई
नाताळची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबापुरीत पंचतारांकित हॉटेल व्यवसायिकांना मात्र, ख्रिसमसच्या जल्लोषामध्ये सहभागी होता येणार नाही. ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टला पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, तसे कोणतेही लेखी आदेश पोलिसांना मिळाले नसल्याने पार्टी आयोजित करण्यासाठी पोलीस परवानगी देत नसल्याचे हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष भारत मलकानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सरकार आणि पोलिसांमधील समन्वयाच्या अभावामुळे पंचतारांकित हॉटेलमधील ग्राहकांचा मात्र ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पुरता हिरमोड झाला. खासगी पार्टी आयोजकांना मात्र शहरात ख्रिसमसचे जोरदार सेलिब्रेशन करता येणार आहे. मलकानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग, मनोरंजन विभाग आणि पोलिसांची परवानगी आवश्यक असते. त्यातील अन्य दोन विभागांच्या परवानग्या असल्या, तरी पोलीस परवानगीविना पार्टी करता येत
नाही. सरकारने केलेल्या घोषणेचे लेखी आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळून उपयोग नाही. ते हॉटेलला परवानगी देणाऱ्या प्रत्येक विभागाला लागू करणे अपेक्षित
होते. ख्रिसमस साजरा करण्यासाठी २४, २५ आणि २६ डिसेंबर रोजी शहरात १० विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ टक्के मनोरंजन करानुसार यंदा प्रशासनाला त्यातून ५ लाख ३१ हजार ७९५ रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयोजकांच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
एक खिडकी योजना सुरू करा
राज्य उत्पादन शुल्क विभाग, मनोरंजन विभाग, पोलीस अशा
विविध विभागांकडून परवानग्या मिळवण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांना बराच वेळ खर्ची घालावा लागतो. परिणामी, प्रशासनाने एक खिडकी योजनेंतर्गत सर्व विभागाच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करावी, असे निवेदन संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.