नो कॉमेंट... शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंच्या ट्विटवर पब्लिकसाठी Comment बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 03:41 PM2022-10-09T15:41:36+5:302022-10-09T15:42:35+5:30
शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. त्यानंतर, शिंदे गटाकडून शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला.
मुंबई - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर, आता निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठल्याने दोन्ही गटांत सामना रंगला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शितल म्हात्रे याही ट्विटवरुन भूमिका मांडताना ठाकरें गटाला लक्ष्य करत आहेत. मात्र, आपली भूमिका मांडताना त्यांनी ट्विटरवरील कमेंट सेक्शन बंद केला आहे. त्यामुळे, केवळ त्यांनी मेन्शन केलेल्याच व्यक्ती त्यांच्या ट्विटरवर कमेंट करु शकतात.
शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. त्यानंतर, शिंदे गटाकडून शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला. तसेच, शिवसेनेच्या महिला नेत्यांना शिंदे गटाच्या प्रवक्त्त्या बनून शितल म्हात्रे प्रत्युत्तर देत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरही त्यांनी ट्विट करुन भूमिका मांडली. ''हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून शिल्लकसेना दूर गेली आहे. म्हणूनच पक्षाचे नाव आणि चिन्ह तुमच्यापासून दूर गेले असावे .... विचार गोठले आहेत, म्हणूनच कदाचित चिन्ह देखील गोठले असावे, अशा शब्दात शितल म्हात्रे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तत्पूर्वी, बाळासाहेबांच्या विचारांचे धनुष्य आणि दिघे साहेबांच्या कृतीचा बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडेच आहे, हे शिवसैनिक जाणतो. म्हणूनच तो आज ठामपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा आहे, असेही ट्विट त्यांनी केले होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून शिल्लकसेना दूर गेली आहे म्हणूनच पक्षाचे नाव आणि चिन्ह तुमच्यापासून दूर गेले असावे .... विचार गोठले आहेत म्हणूनच कदाचित चिन्ह देखील गोठले असावे....
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) October 9, 2022
शितल म्हात्रे या वारंवार ट्विट करुन शिवसेना नेत्यांवर आणि शिवसेनेवर टीका करताना दिसून येतात. आपली भूमिकाही त्या ट्विटरवरुन मांडत आहेत. मात्र, ट्विटर सेक्शनमधील पब्लिक कमेंट त्यांनी बंद केल्या आहेत. त्यामुळे, केवळ त्यांनी ज्यांना आपल्या ट्विटमध्ये मेन्शन केलंय, तेच युजर्सं त्यांच्या ट्विटवर कमेंट करुन शकतात. तर, इतरांना केवळ त्यांची पोस्ट वाचूनच शांत बसावे लागत आहे. दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या फेसबुक अकाऊंटवरील कमेंट बंद केल्या होत्या. मात्र, माध्यमांत बातम्या आल्यानंतर त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. आता, शितल म्हात्रेंनीही ट्विटरवर नो कमेंट असंच म्हटलंय.