कन्फर्म तिकीट नाही; १ हजार ६२८ प्रवाशांना उतरविले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 05:55 AM2024-06-22T05:55:29+5:302024-06-22T05:55:54+5:30
मध्य रेल्वेची कारवाई : प्रवाशांच्या तक्रारींची दखल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईतून राज्यासह देशभरात धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमधून कन्फर्म तिकीट नसलेल्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी एका दिवसांत १,६२८ हून अधिक प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले आहे. भविष्यात देखील मोहीम सुरूच राहणार आहे. मुंबई विभागात सर्वत्र ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेतून देशासह राज्यभरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाज माध्यमांसह रेल्वेकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींमध्ये बहुतांशी प्रवासी लोकल तिकिटावर कर्जत, कसारा, कल्याणपर्यंत मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करत असल्याच्या होत्या. शिवाय मेल-एक्स्प्रेसमधून बहुतांशी प्रवासी हे कन्फर्म तिकीट नसतानही आरक्षित डब्यातून प्रवास करत असल्याच्या होत्या. हे प्रवासी आरक्षित डब्याच्या मधल्या भागासह शौचालयाजवळ बसत, उभे राहत असल्याचे इतर प्रवाशांचे म्हणणे होते. तक्रारीचा भडिमार सुरू असतानाच २० जूनपासून मध्य रेल्वेने मुंबई विभागात याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली. २९ मेल-एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई करत १,६२८ प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.
प्रवास केलेल्या स्थानकादरम्यानचा दंड आकारण्यात येईल. तसेच कुठल्याही स्थानकावर उतरविण्याची कारवाई केली जाईल, असेही मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
...म्हणून आरक्षित डब्यातील गर्दी वाढते
तिकीट खिडकीवर काढलेले तिकीट वेटिंग आले तरी बहुतांश प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. अशा प्रवाशांना टिसीकडून आरक्षित डब्यातून प्रवास करू दिला जातो. मात्र, या तिकिटावरही आरक्षित डब्यातून प्रवास करता येत नाही, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तर जनरल तिकीट घेऊनही अनेक प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. या प्रवाशांकडून दंड वसूल करत त्यांनाही आरक्षित डब्यातून प्रवास करू दिला जातो. मात्र, अशाने आरक्षित डब्यातील गर्दी वाढते, असे इतर प्रवाशांचे म्हणणे आहे.
कोकणात कसे जायचे?
कोकणात जाणाऱ्या गाड्या सातत्याने फुल्ल असतात. गणेशोत्सवात तर रेल्वेत पाय ठेवायला जागा नसते. अशावेळी ही कारवाई सुरूच राहिली तर कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना कसे जायचे? या प्रश्नावर कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त सेवा चालविल्या जातील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.