ना कुटुंबियांशी संपर्क..., ना मायदेशी जाण्याची सोय...; अफगाणी तरुणाची मदतीसाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:24 PM2021-08-17T19:24:55+5:302021-08-17T19:33:53+5:30
महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक अफगाणी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. त्यातील काही भारतात दाखल झाले, तर काही तेथे अडकले आहेत.
सुहास शेलार -
मुंबई : अफगाणिस्तानतालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे प्रचंड अस्थैर्य पसरले आहे. नागरिकांना केवळ मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असल्याने देश सोडण्यासाठी धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यातील विविध विद्यापीठांत शिकणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांची चिंता सतावू लागली आहे. संपर्काची सर्व माध्यमे आणि मायदेशी परत जाण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे हे तरुण प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. (No contact with family, no facility to go home; Struggling to help an Afghan youth)
तालिबानची सत्ता आल्यावर २४ तासांतच बदलला महिला पत्रकाराचा ड्रेस?; जाणून घ्या सत्य
राज्यात शिक्षण घेणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांपैकी ११ जणांच्या शिष्टमंडळाने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी मंगळवारी मुंबई गाठली. मोहम्मद अहमदी हा तरुण त्यातील एक. मूळ अफगाणिस्तानचा हा तरुण काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात उच्च शिक्षणासाठी दाखल झाला. पण तालिबान्यांच्या हिंसाचारानंतर कुटुंबियांशी संपर्क तुटल्याने तो चिंतेत आहे. आई-वडील काबूलमध्ये राहतात. रविवारी केवळ पाच मिनिटे वडिलांशी बोलता आले. त्यानंतर फोन डिस्कनेक्ट झाला. लाईट नसल्यामुळे फोन चार्ज करता येत नाही आणि नेटवर्क नसल्यामुळे संपर्क होत नाही, अशी स्थिती सध्या अफगाणिस्तानात असल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक अफगाणी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. त्यातील काही भारतात दाखल झाले, तर काही तेथे अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. तालिबान्यांच्या धास्तीने टेलिफोन कंपन्यांचे कर्मचारी पळून गेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपर्क व्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे घरच्या माणसांची चिंता सतावत असून, त्यांनाही भारतात आणण्यासाठी सरकारी मदतीची अपेक्षा असल्याचे त्याने सांगितले.
अफगाणिस्तानात खेळ खल्लास, की आणखीही काही शिल्लक? अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय...!
...तर तालिबानी ठार मारतील, अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांनी केली अशी मागणी -
- भारतात असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपुष्टात आली आहे आणि या स्थितीत ते अफगाणिस्तानात परत जाऊ शकत नाहीत. कारण तालिबानी त्यांना ठार करतील. त्यामुळे आमच्या व्हिसाची मुदत वाढवून द्यावी. आमच्या कुटुंबीयांना काही दिवस भारतात आश्रय द्यावा.
- पालकांकडून येणारी मदत बंद झाल्यामुळे आम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भारतात नोकरीच्या संधी द्याव्यात. अफगाणिस्तानची राजवट बदलल्यामुळे दूतावासातून मदत मिळणे अवघड झाले आहे. पंतप्रधान देश सोडून पळून गेल्यामुळे जनता वाऱ्यावर आली आहे. आता आम्ही केवळ भारताच्या भरवशावर असल्याचेही मोहम्मदने सांगितले.