Join us

दहावी, बारावी वगळून इतर वर्गांच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:06 AM

विद्यार्थी, पालक संभ्रमात; लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची अधिकाऱ्यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मार्च अखेर आला तरी अद्याप ...

विद्यार्थी, पालक संभ्रमात; लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च अखेर आला तरी अद्याप शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीची घोषणा किंवा त्यासंदर्भातील कोणतेच नियोजन शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाही. शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीआधी पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या यंदाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील निर्णयही शिक्षण विभागाकडून अजून गुलदस्त्यातच आहे. मागील वर्षी याचवेळी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाने एव्हाना विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे आता शैक्षणिक संस्था, शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक सर्वच संभ्रमात आहेत.

मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या अनेक शाळांना कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा कुलूप लावावे लागले. या पार्श्‍वभूमीवर आता या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली. काही जिल्ह्यांतील ठिकाणी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी मुख्याध्यापकांसह विषय शिक्षकांनी ठेवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. इतर अनेक राज्यांतील प्रशासनानी यंदा विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारवर पुढील वर्गात प्रवेश द्यायचा निर्णयही घेतला आहे. मात्र, मार्च महिना संपत आला तरी राज्याच्या शिक्षण विभागाचे परीक्षांसंदर्भात अद्याप काहीच निर्देश नसल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत.

* नववी, अकरावीबाबतही प्रश्नचिन्ह कायम!

नववीचे विद्यार्थी पुढच्या वर्षी दहावीत, तर अकरावीचे विद्यार्थी बारावीत जाणार आहेत. त्यांना अभ्यासक्रमाची व स्वत:च्या प्रगतीची जाणीव व्हावी, या हेतूने विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावीच लागेल, असे मत शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी मांडले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून अद्याप काहीच सूचना नसल्याने विद्यार्थी, पालकांपुढील परीक्षा कधी हाेणार याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे. पुढील महत्त्वाच्या वर्षातील अभ्यासाला विद्यार्थ्यांनी कधी सुरुवात करायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

* अंतर्गत गुणांबाबत निर्णय नाही!

मागील वर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षावगळता इतर विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण व ऑनलाईन परीक्षांच्या आधारावर पुढील वर्गात प्रवेश देणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.