पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा अद्याप निर्णय नाही - शिक्षणमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:25 AM2020-12-11T04:25:25+5:302020-12-11T04:25:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात २३ नोव्हेंबरपसून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले असून सद्यस्थितीत ५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात २३ नोव्हेंबरपसून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले असून सद्यस्थितीत ५ लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थिती दर्शवित आहेत. मात्र असे असले तरी पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झाले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. मात्र, लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आम्ही अद्याप कोणतीही भूमिका मांडली नसल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.
पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करताना सर्वप्रथम या वर्गातील विद्यार्थी, शिक्षकसंख्या, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणे, त्यांची सुरक्षा, कोरोना चाचण्या व वर्गातील नियोजन ही मोठी जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा, आरोग्यविषयक बाबींचा विचार करून तसेच यासंदर्भात स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सरकार योग्य तो निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
* दहावी, बारावीच्या परीक्षा नेहमीच्याच पद्धतीने
नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे, ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासंदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
..............................