वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबई-दिल्ली रेल्वेसेवा बंद होणार?; रेल्वे मंत्रालय म्हणतं...
By कुणाल गवाणकर | Published: November 20, 2020 08:53 PM2020-11-20T20:53:53+5:302020-11-20T20:56:59+5:30
मुंबई-दिल्ली रेल्वेसेवा बंद होण्याच्या चर्चेवर रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेले अनेक दिवस मुंबईत मुंबईत हजारपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र आज हा आकडा हजारच्या पुढे गेला आहे. तर दिल्लीतही कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दिल्लीत दररोज कोरोनाचे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे दिल्ली-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.
दिल्ली-मुंबई दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं. मात्र रेल्वेनं असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं ट्विट करून स्पष्ट केलं आहे. दिल्ली-मुंबई दरम्यानची हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.
There have been reports in section of media today about cancellation of certain trains on Delhi Mumbai sector. It may be clarified that Railways has NOT taken any decision regarding cancellation of trains on Mumbai Delhi sector.
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 20, 2020
कशामुळे सुरू झाली चर्चा?
राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दिल्लीत काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दिल्लीतील परिस्थिती लक्षात घेता मुंबईतही काळजी बाळगली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव संजीव कपूर यांच्या माहितीनुसार दिल्ली-मुंबई प्रवासामुळे कोरोनाचा फैलाव मुंबईत वाढू शकतो. त्यामुळे या मार्गावरील हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद करण्यासाठीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागांशी चर्चा करून लवकरच याबाबतचा आदेश जारी केला जाऊ शकतो. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.