मुंबई/नागपूर : अर्थखात्याची सूत्रे स्वीकारताच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटातील आमदारांना विकासकामात झुकते माप दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना नाही, तर भाजप, शिवसेनेच्या आणि इतरही पक्षांच्या आमदारांना निधी देण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते रविवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुरवणी मागण्यांत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५-२५ कोटींचा निधी दिला गेल्याचा दावा करण्यात आहे. यावर सरकार खरेच इतक्या मोठ्या प्रमाणावर पुरवण्या मागण्या मान्य करू शकते, याचे मला कौतुक आहे. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला, तर थोडीशी खुशी राहणारच ना, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)
नेते जयंत पाटील यांनी लगावला आहे. तर जो आमच्या बरोबर येईल, त्यालाच फक्त विकासकामासाठी निधी दिला जाईल, बाकीच्यांना नाही, हे सत्ताधाऱ्यांचे धोरण अत्यंत घातक आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
सत्ताधारी आमदारांनाच विशेष निधी दिला जात असेल आणि विरोधी आमदारांना डावलले जाणार असेल, तर समतोल विकास कसा होईल, असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे, तर दुसरीकडे निधीवाटपाबाबत काहीच तक्रार नाही. आमच्या आमदारांनाही निधी मिळाला आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे. केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांनाच नव्हे, तर भाजप-सेनेच्या आमदारांना आणि इतरही काही आमदारांना दिला आहे. सर्वांना हा निधी दिला आहे. त्यामुळे केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांना निधी दिला, असे म्हणणे योग्य होणार नाही.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.