घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्यास मोदी सरकारचा नकार; मुंबई महापालिकेला परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:07 PM2021-03-30T18:07:04+5:302021-03-30T18:07:59+5:30
Corona Vaccination In Mumbai: मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळून लावला
Corona Vaccination In Mumbai: मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळून लावला आहे. घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारचं कोणतंही धोरण अस्तित्वात नाही, असं महापालिकेला सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी बूथ पद्धतीनं कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. लस घेण्यासाठी लोकांना दोन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये म्हणून बूथ पद्धतीची मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील विधान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं. (No door to door Covid vaccination in Mumbai)
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुंबईमध्ये जवळपास दीड लाख लोकं असे आहेत जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा दिव्यांग आहेत. या लोकांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत जाणं शक्य नाही. त्यामुळे अशांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची असं कोणतही धोरण नाही असं सांगितलं आहे. परवानगी मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता"
भाजप आमदारानं केली होती मागणी
अंधेरी पश्चिम येथील भाजपचे आमदार अमित साटम यांनीही मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. लसीकरणाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल यासाठी झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये पालिकेने लसीकरण मोहिम राबवायला हवी, चेन्नईमध्येही अशा मोहिमेला चांगलं यश मिळालं आहे, असंही आमदार साटम यांनी म्हटलं होतं.
केंद्रीय अधिकारी काय म्हणतात?
केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या कोरोनची दुसरी लाट आलेली आहे. "लसीकरणासंदर्भात अनेकांना भीती वाटत असली तरी ते रुग्णालयात जाऊस लस टोचून घेत आहेत. आम्ही आता लस तळागाळातील लोकांपर्यंत नेणार आहोत. या मोहिमेमुळे नागरिकांना लस घेण्यासाठी दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागणार नाही", असं आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.
मुंबईत दिवसाला १० हजार रुग्ण?
मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर देखील केंद्रानं चिंता व्यक्त केली आहे. कोरोना वाढीचा सध्याचा वेग पाहता येत्या काळात मुंबईत दिवसाला १० हजार रुग्ण सापडतील अशी भीती आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिका देखील सज्ज
केंद्रानं व्यक्त केलेल्या चिंतेसाठी महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा सुरेश काकाणी यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे डिन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिवसाला १० हजार कोरोना रुग्ण आढळून येतील याचा विचार करुन तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत, असं सुरेश काकाणी यांनी सांगितलं.