लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजकारणात जर-तरला अर्थ नसतो. जी परिस्थिती निर्माण होते त्यावरून निर्णय घेतले जातात, असे सांगतानाच शिवसेनेसोबत कोणतेही शत्रुत्व नाही. ज्यांच्या विरोधात लढून विजयी झालो त्यांचाच हात पकडून आमचे मित्र निघून गेले, त्यामुळे वैचारिक मतभेद निर्माण झाल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाढत्या गाठीभेटींमुळे विविध तर्क सुरू आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, कोणाच्या भेटीगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजपची शिवसेना किंवा कुठल्याही पक्षाशी भेटगाठ नाही. भारतीय जनता पक्ष हा एक सक्षमविरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून लढाई करण्याची आमची तयारी आहे, असे उत्तर फडणवीसांनी दिले. भविष्यात युती होणार का? या प्रश्नावर राजकारणात जर-तरला फारसा अर्थ नसतो. जी परिस्थिती निर्माण होते त्यानुसार निर्णय घेतले जातात. जर-तरवर जे राजकारणी राहतात ते स्वप्नच पाहत राहतात, असेही ते म्हणाले.