लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): नाताळनिमित्त शनिवार ते सोमवार सलग सुट्या आल्या आहेत. हीच संधी साधत मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी मुंबईबाहेर जात आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना दुपारी १२ पूर्वी प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांचा प्रवास कोंडीमुक्त होण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली.
सलग सुट्यांमुळे अनेकदा वाहनांची घाटात कोंडी होत असते. ही कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी अवजड वाहनांना थांबविण्यात येते. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात, असे सिंगल यांनी सांगितले.
मागील वाहतूक कोंडीचा आढावा घेता अवजड वाहने व कार हे सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत एकत्र आल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर अवजड वाहनांचा प्रवास दुपारी १२ नंतर सुरू झाल्यास सर्वांचा प्रवास सुरळीत होईल. तसेच वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनमध्ये बिघाड होणे यासह इंधन व वेळेची बचत होईल. या फायदेशीर सूचनांचे सर्व अवजड वाहन चालकांनी पालन करावे, असे आवाहन सिंगल यांनी केले आहे.