नो एण्ट्री... तरीही ई-बाइकवाल्यांची सर्वत्र घुसखोरी
By मनीषा म्हात्रे | Published: October 7, 2024 10:25 AM2024-10-07T10:25:48+5:302024-10-07T10:26:27+5:30
त्यात ई-बाइकस्वारांची संख्या लक्षणीय असल्याचे नुकतेच उघड झाले आहे.
मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय शहर अशी मुंबई महानगराची ख्याती असली तरी येथील रस्ते आणि त्यावरील वाहतूक हा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. मुंबईतील वाहतूक शिस्तबद्ध असल्याचा समज आहे. मात्र, या समजाला तडे देणारे अनेक प्रसंग शहरात दररोज घडत असतात. ज्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध असा सूचना फलक लावलेला असतो, त्याच ठिकाणी बिनदिक्कतपणे आपली बाइक किंवा कार घुसविण्याची मर्दुमकी येथे सहज गाजवली जाते. त्यात ई-बाइकस्वारांची संख्या लक्षणीय असल्याचे नुकतेच उघड झाले आहे.
ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ई-बाइकने घेतलेली धोकादायक वळणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत तर आहेतच, शिवाय पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. सर्रास नियमभंग करत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ई-बाइकस्वारांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून दिवसाला दहा ते १५ जणांवर कारवाई करण्यात येत आहे. डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा नोंदवत थेट ई-बाइकवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
ई-बाइक अस्तित्वात येण्याआधीही ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकी वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत होत्या. कमीतकमी वेळेत वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या नावाखाली सर्रास नियमभंग होत होते. त्यात मोटार वाहन कायदा लागू नसल्याने ई-बाइकस्वार कर्मचाऱ्यांनी नियमभंगाचा कळस गाठला.
सिग्नल न पाळणे, हेल्मेट न वापरणे, नो-एण्ट्रीत शिरणे, चुकीच्या बाजूने दुचाकी चालवणे, मर्यादेपेक्षा अधिक वेगाने दुचाकी चालवणे या नियमभंगांबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. अलीकडे या तक्रारींचा ओघ वाढला होता. ई-बाइकना मोटार वाहन कायदा लागू नाही. मात्र, भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार कारवाईची तरतूद आहे. त्याचाच आधार घेत कारवाई वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या आदेशाने ई-बाइक चालकांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे.
गेल्या दीड महिन्यात ७६८ गुन्हे नोंदवत ८९७ ई-बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. ९ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर दरम्यानची ही कारवाई आहे. सिग्नल मोडल्याबद्दल ४७५४ , नो-एण्ट्रीत शिरल्याबद्दल ४२६२ आणि चुकीच्या दिशेने दुचाकी चालवल्याबद्दल १ हजार ५३१ कारवाया करण्यात आल्या. या दीड महिन्यात एकूण ६६ लाख ३५ हजार ७०० रुपयांचे ई-चलन बजावत १० लाख ७९ हजार ४०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशेष मोहीम राबवत वाहतूक पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात एकूण ११७६ ई-बाइकवर कारवाई करण्यात आली. त्यात २२१ गुन्हे नोंदवण्यात आले, २९० ई-बाइक जप्त करण्यात आल्या. एकूण प्रकरणांत सिग्नल मोडल्याबद्दल ४९१, नो एण्ट्रीत शिरल्याबद्दल २५२ आणि राँग साइड दुचाकी चालवल्याबद्दल २७२ कारवाई केल्या. हाच कारवाईचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाहतूक नियम मोडणारे ई-बाइकस्वार आढळल्यास मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांनाही नोटीस जारी करून दुचाकीद्वारे विशेषतः ई-बाइकद्वारे पार्सल पोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवरा, त्यांना वाहतुकीच्या नियमांची आणि ते मोडल्यास उद्भवणाऱ्या धोक्याची व कारवाईची जाणीव करून द्या, अशी सूचना वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.