मुंबईः कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्य सरकार संभाजी भिडे यांना पाठीशी घालत असल्याचा एल्गार परिषदेचा आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिडे गुरुजींना 'क्लीन चिट' दिली आहे.
'संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल घडवताना पाहिल्याची तक्रार एका महिलेनं केली होती. ती पोलिसांनी नोंदवून घेतली आणि कारवाईही सुरू केली. त्यानंतर आजपर्यंत जेवढे पुरावे समोर आलेत, त्यात संभाजी भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा सापडलेला नाही. या दंगलीत त्यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट होत नाही', असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नमूद केलं. त्याचवेळी, भिडे गुरुजींची चौकशी बंद केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आपल्याकडे एक फेसबुक पोस्ट दिली आहे. भिडे गुरुजींच्या सांगण्यावरूनच दंगल भडकल्याचा दावा त्यांनी या पोस्टच्या आधारे केला आहे. त्या पोस्टचीही चौकशी केली जाईल, असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं. त्यावेळी कालचा एल्गार मोर्चा आणि भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी, याबाबतही त्यांनी सरकारची बाजू मांडली.
कोरेगाव भीमा दंगलीला चिथावणी देण्याच्या आरोपावरून राज्य सरकारने मिलिंद एकबोटे यांना अटक केली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे राज्य सरकार संभाजी भिडेंना अटक करत नसल्याचा आरोप एल्गार परिषदेचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला होता. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. त्यांना अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना, भिडे गुरुजींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उच्च न्यायालयाने सांगितल्यावर मिलिंद एकबोटेंना अटक केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. परंतु, ही वस्तुस्थिती नाही. त्याचप्रमाणे, भिडे गुरुजींचा दंगलीत सहभाग होता का, याचा तपासही पोलिसांनी केलाय. मात्र त्यातून त्यांच्याविरोधातील कुठलाही पुरावा सापडलेला नाही आणि म्हणूनच त्यांना अटक केलेली नाही, असा खुलासा त्यांनी केला. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर आणि एल्गार परिषदेतील अन्य संघटना काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.