लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागासवर्ग आयाेगाची ही पहिली बैठक आहे. यानंतर अजूनही बैठका हाेतील व त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सर्वेक्षण करून आरक्षणाबाबतचा निर्णय देण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. कुणी उपोषणाला बसले आणि त्यांनी उपोषणस्थळावरून ठराविक दिवसांत आरक्षण देण्यात यावे, यासाठी दिलेल्या मुदतीनुसार न्यायव्यवस्था किंवा आयाेग काम करत नाही. प्रक्रियेसाठी जो आवश्यक कालावधी आहे, तो लागणारच आहे, ताे काेणासाठी बदलता येणार नाही, अशा शब्दांत मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता शनिवारी फटकारले.
राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील शासकीय विश्रामगृहात शनिवारी झाली. आयाेगाचे सदस्य तथा निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, ॲड. बालाजी किल्लारीकर, लक्ष्मण हाके हे उपस्थित हाेते. मनाेज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. ताेपर्यंत आपला निर्णय हाेईल का असे विचारले असता आयोगाचे सदस्य ॲड. बालाजी किल्लारीकर म्हणाले, ‘कुणी उपोषणाला बसले व आरक्षणासाठी त्यांनी अंतिम मुदत दिली, या आधारे आयोगाचे कामकाज चालत नाही.
शास्त्रोक्त अभ्यासाची गरज: संभाजीराजेगरीब मराठा समाजावर अन्याय होत आहे. हे आरक्षण मिळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागेल, असे मत स्वराज पक्षाचे प्रमुख व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात व्यक्त केले. राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.