सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:37 AM2023-12-01T10:37:30+5:302023-12-01T10:38:01+5:30
अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. त्यातच डॉक्टरांची सरसकट बदली केल्यामुळे सध्या रुग्णांचे हाल होत आहेत. माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
ईएसआयसी रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा १४ ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. गेली चार साडेचार वर्षे हे रुग्णालय बंद होते. १७ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या आगीच्या घटनेनंतर हे रुग्णालय बंद होते. जेव्हा ते सुरू झाले तेव्हा तिथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. पण, अद्याप आयपीडी सेवा, सीटी स्कॅन, एमआरआय, रक्तपेढी, शस्त्रक्रिया विभाग बंदच आहेत.
रक्तचाचणी विभाग, एक्सरे, युएसजी हे विभाग अगदी मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यक ती यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवले जाते किंवा काहीवेळा त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे रुग्णांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
नवीन डॉक्टरांची नियुक्ती नाही...
ईएसआयसी मुख्यालयाने डॉक्टरांच्या सरसकट बदलीचा निर्णय घेतला आहे.
इथे असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची अन्यत्र बदली केली जात असल्यामुळे रुग्णांच्या उपचारावर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
बदली केल्यानंतर त्याजागी दुसरे डॉक्टर्स घेतलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
सद्यपरिस्थिती पाहता हे रुग्णालय बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे रुग्णालय सरकारला श्रीमंतांच्या ताब्यात द्यायचे आहे. सध्या हे रुग्णालयच व्हेंटिलेटरवर आहे. कोणत्याही क्षणी त्याची सगळी यंत्रणा कोलमडून पडू शकते.- राजेश शर्मा