बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेतून संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. बदलापूर येथे संतप्त नागरिकांनी रेल्वेगाड्या रोखत आंदोलन केले, यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली.
Thane: बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक
"बदलापूरमध्ये जे घडलं आहे ते भयंकर आहे. चार वर्षाच्या मुलीवर या प्रकारचा अत्याचार होतं असेल तर समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. आता आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातही अशा घटना घडत आहेत. त्याची नोंद कोण घेत नाही, एफआयआर दाखल करायला चार दिवस लागतात.गुजरात सारख्या ठिकाणी बलात्कार करणाऱ्या लोकांचा सत्कार केला जातो तेव्हा समाजात काय संदेश जाणार आहे? आता समाजाने ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे का? राज्यकर्ते आणि प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही, त्यांच्यावर अवलंबून राहून काही होणार आहे. तीवृ निषेध रस्त्यावर उतरून करायला पाहिजे, तेच आता बदलापूरात दिसत आहे. गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, असंही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
"या प्रकरणाचा राग सगळ्यांना येत आहे. फास्टट्रक कोर्टात प्रकरण चालण्याआधी या प्रकरणाची नोंदच होत नाही. तेव्हा ही आता विकृत मानसिकता वाढतच राहणार आहे. कारण वरुन समर्थन मिळतंय. मग महिलांनी जायचं कुठे?, असा सवालही खासदार शिंदे यांनी केला.
पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक
बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला हिंसक स्वरूप आले. पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन करणाऱ्यांनी दगडफेक केली केली. बदलापुरात घडलेला चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताच रेल्वे प्रवाशांनी आणि आंदोलन करणार्यांनी देखील दगडफेक करून उत्तर दिले. प्रवाशांचा संताप पाहून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनी ही माघार घेत सुरक्षित स्थान गाठले. बदलापूरकरांचा हा रौद्ररूप पाहून पोलीस देखील स्तब्ध झाले.