मुंबई : लॉकडाउन झाल्यापासून मजुरी बंद झाली. सुरुवातीला काही दिवस दोन वेळचे जेवण दिले जात होते. गेल्या तीन दिवसांपासून तेही आलेले नाही. रेशनिंग कार्ड नसल्याने आमच्या नशिबी स्वस्त दरातले धान्यही नाही. त्यात घरमालकाने भाड्यासाठी तगादा लावला आहे. दोन मुली, एक मुलगा आणि बायकोला खायला काय देऊ, असा सवाल उपस्थित करणारा मोहम्मद अकलम गावी परतण्यासाठी अक्षरश: तडफडत आहे. ‘‘मरई क डर नाई; जियेई क चिंता,’’ असे सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळतात.
आपल्या घरी परतण्यासाठी वांद्रे येथे जमलेल्या परप्रांतीय मजुरांच्या जमावामुळे मंगळवारी सर्वांनाच हादरा बसला. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांतून पोटा-पाण्यासाठी मुंबई, ठाण्यात आलेले मजूर प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसतात. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून आलेला मोहम्मद अकमल आपल्या कुटुंबासह कोपरीतल्या झोपडपट्टीत राहतो. ठाणे स्टेशनच्या पूर्वेला सुरू असलेल्या सॅटिसच्या कामात पायलिंग मशीनवरील कामापोटी त्याला दररोज सहाशे रुपये मजुरी मिळायची. गेल्या २५ दिवसांत कंत्राटदाराने त्याला एकही पैसा दिलेला नाही. ही परिस्थिती आणखी बिकट होत चालल्याने एकटा मोहम्मदच नाही तर त्याच्यासारखे हजारो मजूर हतबल झालेआहेत.इथे जर उपाशीच मरायचे असेल तर आम्हाला गावी आमच्या आई-वडिलांसमोर मरू द्या, ट्रेन सुरू करता येत नसतील तर आम्हाला चालत गावी जाण्याची परवानगी द्या, असे आर्जव उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून आलेला बांधकाम मजूर मनोज कुमार करीत होता.असुरक्षिततेच्या भावनेने धडपडराहत्या घराचे भाडे देण्यास पैसे नाहीत. जेवणाची अडचण झाली आहे. रोजचे काम तर केव्हाच बंद झाले आहे. गावी असलेल्या कुटुंबाशी फोनवर बोलता येत नाही; कारण फोनमधला बॅलन्स संपला आहे. पालिकेच्या शेल्टरमध्ये गेले तरीदेखील तिथे राहण्याचा, खाण्याचा प्रश्न सुटेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत घरची ओढ सतावत असून, आता येथे असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्याने गावी जाण्यासाठी मुंबईतले मजूर धडपड करीत असून तेथे तरी हक्काने मरू, असे त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळेच वांद्रेतील घटना घडल्याचे मुंबईतील कामगार प्रश्नाचे अभ्यासक सीताराम शेलार यांनी सांगितले.लॉकडाउनमुळे आम्ही चालत घरी निघालो होतो. पण, पोलिसांनी अडवून आम्हाला मजुरांच्या छावणीत ठेवले. १४ एप्रिल रोजी लॉकडाउन संपेल आणि पुन्हा रोजगार मिळेल किंवा गावी जाण्यासाठी ट्रेन सुरू होतील अशी आशा होती. परंतु, तो कालावधी आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत जगणे अशक्य झाल्याचे मत ढोकाळी येथील मजूर उमाशंकर रामदासी यांचे म्हणणे आहे. या छावणीत त्यांना दोन वेळचे जेवण मिळते. मात्र, हाताला काम नाही, मजुरी नाही, कोरोनाची लागण होण्याची भीतीही त्यांना वाटते.