मुंबई महानगरपालिकेने वाहनधारकांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार आता खासगी वाहनधारकांना मास्क न लावताही गाडी चालवता येणार आहे. खासगी वाहनांमध्ये मास्क न घालणाऱ्यांवर पालिकेकडून आता कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
मुंबईत आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या नियमांमध्ये हळूहळू सूट देण्यात येत आहे. खासगी वाहनांमध्ये मास्क न घातल्यास आता दंड आकाराला जाणार नसला तरी सार्वजनिक वाहनांमध्ये मात्र मास्क घालणं गरजेचं आहे, असं पालिकेनं नव्या नियमावलीत नमूद केलं आहे.
कोरोनापासून बचावासाठी मुंबई महानगर पालिकेने ८ एप्रिल २०२० रोजी सर्व नागरिकांना मास्क घालणं बंधनकारक केलं होतं. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई देखील केली जात होती. मास्क घालण्याच्या सक्तीसह जे या नियमाचा भंग करतील आणि मास्क घालणार नाहीत त्यांना १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात ही रक्कम कमी करुन २०० रुपये इतकी करण्यात आली होती.