रेशनिंग नाही, गॅस सबसिडी नाही
By admin | Published: April 13, 2015 02:21 AM2015-04-13T02:21:40+5:302015-04-13T02:21:40+5:30
वसई तालुक्यात दोन महिन्यापासून रेशनिंगचा व गॅस सबसिडीचा पत्ता नसून अन्नधान्यापासून ग्रामीण भागातील गरीब जनता वंचित आहे.
पारोळ : वसई तालुक्यात दोन महिन्यापासून रेशनिंगचा व गॅस सबसिडीचा पत्ता नसून अन्नधान्यापासून ग्रामीण भागातील गरीब जनता वंचित आहे. त्यामुळे अच्छे दिन येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेवर उपासमारी सोसण्याची वेळ ओढावली आहे.
अन्न विधेयकामुळे गरीब जनतेला उपाशी पोटी झोपावे लागणार नाही आणि या विधेयकामुळे सर्व कार्डधारकांना अन्नधान्य मिळेल असे दिव्यस्वप्न दाखवण्यात आले पण ते स्वप्न राहिले आहे. या दोन महिन्यात सर्व कार्डधारकांना सोडाच पण दारिद्र्यरेषेखालील जनतेलाही मिळालेले नाही. सर्व तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात तर रेशनिंग जनतेला मिळालेले नाही. मार्च संपल्यानंतर एप्रिल महिन्यात सुद्धा अन्नधान्याचा पत्ता नाही त्याचप्रमाणे गॅस भरताना पूर्ण पैसे भरून देखील सबसिडी वेळेवर आपल्या खात्यात पडत नसल्याची ओरड गॅसधारकांची आहे. पूर्वी गॅसची सबसिडी वगळून पेैसे भरून गॅसची नोंद करून तो घ्यावा लागत असे. पण आता सबसिडीचे देखील पैसे भरावे लागत असल्यामुळे ग्रामीण जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.