मुंबई : ‘मुलगी नको, मुलगाच हवा’ अशी मानसिकता फक्त ग्रामीण भागातील लोकांची असते असे नाही, तर सुशिक्षित शहरी भागात राहणाऱ्या अनेकांना ‘मुली नको’ असेच वाटत असते. ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. दारिद्यरेषेखालील कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला आल्यावर खर्च वाढतो, असे त्यांना वाटू लागते. यासाठीच शासनाने विविध योजना सुरू केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सहावा राष्ट्रीय लाडली पुरस्कार सोहळा शुक्रवार, २० मार्चला टाटा थिएटर येथे सायंकाळी साडेसहाला पार पडला. या वेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ््यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विशेष पुरस्कार देण्यात आला; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. यंदा १३ जणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात कम्युनिटी रेडिओसाठी काम करणाऱ्या नीतू सिंग हिला ‘मेरे भी कुछ सपने हैं’ या कार्यक्रमासाठी तर लैंगिक विषयावर उत्तम वृत्तसंकलन करण्यासाठी रवींद्र सत्यर्थी यांना पुरस्कार देण्यात आला. के. ए. बिना यांना कॉलमसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या कार्यक्रमासाठी अलका धूपकर यांना सन्मानित करण्यात आले. जाहिरात क्षेत्रात ‘तुम नहीं बदले’, ‘रिस्पेक्ट वूमन’, ‘व्हेइकल लोन’ या जाहिरातींना ही पुरस्कार देण्यात आला. (प्रतिनिधी)
शहरांतही ‘मुली नको’ मानसिकता -मुख्यमंत्री
By admin | Published: March 23, 2015 2:05 AM