ना पहारा.. ना सुरक्षेचा सहारा...दादर चौपाटीची सुरक्षा राम भरोसे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:59 AM2023-08-28T11:59:14+5:302023-08-28T11:59:34+5:30
मुंबई : एकीकडे चैत्यभूमी तर त्यालाच लागून गणेशद्वार चैत्यभूमीच्या जवळच स्मशानभूमी असा संवेदनशील परिसर असलेल्या दादर चौपाटीची सुरक्षा राम ...
मुंबई : एकीकडे चैत्यभूमी तर त्यालाच लागून गणेशद्वार चैत्यभूमीच्या जवळच स्मशानभूमी असा संवेदनशील परिसर असलेल्या दादर चौपाटीची सुरक्षा राम भरोसे असल्याचेच उघडकीस आले आहे. येथील समुद्रात पर्यटक मोठ्या संख्येने उतरत नसले तरी काही अतिउत्साही पर्यटक समुद्रात जीवरक्षकांची नजर चुकवून समुद्राचा आनंद घेत आहेत. पोलिसांची चौकी जवळच असली तरी माटुंग्याच्या दिशेने दादरकडील बाजूस चौपाटीवर पोलिसांचा पहारा नाही.
कुलाबा ते गोराईपासून मुंबईला १४५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, मुंबईकरांना समुद्रकिनारी फिरण्यासाठी सहा चौपाट्या आहेत. यापैकी दादर चौपाटी ही संवेदनशील चौपाटी म्हणून ओळखली जाते. या चौपाटीवर दररोज पर्यटकांचा राबता असतो. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ६ जीवरक्षक तैनात आहेत. याशिवाय पोलिसांची चौकी या चौपाटी लगतच असून, पोलिसही या चौपाटीवर गस्त घालत असतात. समुद्रात निर्माल्य तसेच दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने पर्यटक या ठिकाणी सहसा जात नाहीत.
आपत्ती प्रतिसाद पथकातील सुरक्षारक्षक
पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करूनही बरेचदा पर्यटक नजर चुकवून समुद्रात शिरतात. ११ जून रोजी अंधेरीच्या वर्सोवा समुद्रात आठ तरुण शिरले. दुर्दैवाने चौघांचा बुडून मृत्यू झाला. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी सहाही समुद्र चौपाट्यांवर पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील सुरक्षारक्षक नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत दिले. हे सुरक्षारक्षक आणि जीवरक्षक प्रयत्न करतील. तसेच पाण्यात बुडण्याच्या घटनांपासून नागरिकांचा बचावही करतील.
पेट्रोलिंगच्या गाडीवर धूळ
दादरच्या समुद्र किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी पोलिसांना वाळूत चालणारी पेट्रोलिंग गाडी देण्यात आली आहे. ही गाडी नादुरुस्त असल्याची माहिती समोर येत असून, ती येथील पोलिस चौकीच्या बाहेर शेडमध्ये धूळ खात उभी आहे. पूर्वी या वाहनाद्वारे गस्त घालण्यात येत असे, अशी माहिती येथे पाणीपुरीचा व्यवसाय करणाऱ्या एका इसमाने दिली.