Join us  

नाही ‘एचएमआयएस’ तरीही..., रुग्णांचा डेटा सुरक्षित, २४ तास सर्व्हर रूम दिमतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 6:43 AM

२००९ पासून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील १६ रुग्णालयांमध्ये डिजिटल पद्धतीने रुग्णांची संपूर्ण माहिती जतन केली जात होती.

मुंबई : रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचा डेटा एकत्रित रहावा यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) सुरू करण्यात आली.

मात्र, गेल्या वर्षी अचानक या प्रणालीला राज्य सरकारने ब्रेक लावला. त्यामुळे या प्रणालीत असलेल्या रुग्णांच्या नोंदीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, संबंधित रुग्णालयांनी गेल्या वर्षांतील रुग्ण डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व्हर रूम कार्यान्वित केली असून त्यासाठी २४ तास वातानुकूलन यंत्रणा सुरू ठेवण्यात आली आहे. 

२००९ पासून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील १६ रुग्णालयांमध्ये डिजिटल पद्धतीने रुग्णांची संपूर्ण माहिती जतन केली जात होती. त्यामुळे रुग्णाला देण्यात आलेल्या त्याच्या एका क्रमांकावर रुग्णाची संपूर्ण नोंद, त्याच्या जुन्या आजाराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत होती. निवासी डॉक्टर, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक सर्व रुग्णांची माहिती संगणकात नोंद करून ठेवत होते. मात्र, या महाविद्यालयांत आता एचएमआयएस नसल्यामुळे डॉक्टरांना जुन्या पद्धतीने माहिती लिहून काढावी लागत आहे. त्यामुळे डॉक्टर कमालीचे वैतागले आहेत.

एकंदरच सेवा आणि त्यावरील शुल्क यावरून सेवा देणारी कंपनी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रकरण कोर्टात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये एचएमआयएस लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. येत्या तीन-चार महिन्यांत ही यंत्रणा कार्यन्वित होईल.

डेटामध्ये काय?  रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली बंद करण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांच्या डेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.      या डेटाच्या आधारावर भविष्यातील अनेक आरोग्य क्षेत्रातील गोष्टीचे धोरण निश्चित करता येऊ शकते.      डेटामध्ये लाखो रुग्णांच्या आरोग्याची माहिती आहे.     कोणत्या स्वरूपाचे आजार महिलांना, पुरुषांना आणि मुलांना होतात. तसेच कोणत्या स्वरूपाची औषधे या रुग्णालयातून त्यांना देण्यात येतात या संबंधीची सर्व माहिती त्यात आहे.

टॅग्स :आरोग्य