Join us

मुंबईत यंदाही मालमत्ताकरात वाढ नाही; ७३६ कोटींचा भार टळला, विधानपरिषदेत विधेयक एकमताने मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:32 AM

मुंबई पालिकेचा कायदा अन्यत्र लागू करणे शक्य होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुकांच्या तोंडावर कोणतीही करवाढ केली जात नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला. त्याविषयीचे विधेयक विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही बुधवारी मंजूर झाले. यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करवाढ टळली आहे.  सुमारे ७३६ कोटी रुपयांचा कराचा वाढीव आर्थिक भार टळला आहे.

मुंबई महापालिका अधिनियम,१८८८ या कायद्यात प्रलंबित असलेली सुधारणा विचारात घेता, २०२३-२४ मध्ये भांडवली मूल्यात सुधारणा न करता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील करदात्यांना सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार मंगळवारी विधानसभेत विधेयक मांडले होते. विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी हे विधेयक मंजुरीसाठी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत मांडले. 

यावेळी उदय सामंत म्हणाले, निवडणूक लक्षात घेऊन हे विधेयक आणलेले नाही तर मुंबईकर नागरिकांवर मालमत्ताकराचा भार बसू नये, यासाठी हे आहे. त्यानंतर सभागृहाने एकमताने हे विधेयक मंजूर केले.

...अन्य पालिकांतही लागू करामुंबई महापालिकेसंदर्भात जो निर्णय घेतला जात आहे तोच निर्णय राज्यातील इतर महापालिकांनाही लागू करावा, राज्यातील सर्व महापालिकांचा एकसमान कायदा असावा, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर मंत्री सामंत म्हणाले, अन्य महापालिकांच्या तुलनेत मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे मुंबई पालिकेचा कायदा अन्यत्र लागू करणे शक्य होणार नाही.

टॅग्स :मुंबई