२०१९ पासून पार्किंग शुल्कात वाढ नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:10 AM2021-09-08T04:10:22+5:302021-09-08T04:10:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो संकुलाबाहेर अतिरिक्त शुल्कवसुली केली जात असल्याचा आरोप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो संकुलाबाहेर अतिरिक्त शुल्कवसुली केली जात असल्याचा आरोप करीत मनसेने सोमवारी आंदोलन केले. मात्र २०१९ पासून पार्किंग किंवा अन्य शुल्कात कोणत्याही प्रकारची वाढ केली नसल्याचे स्पष्टीकरण विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
मुंबई विमानतळाच्या कार्गो संकुलात दररोज शेकडो अवजड मालवाहू वाहने ये-जा करतात. त्यांच्याकडून नियमितपणे टोल आणि पार्किंग शुल्क घेतले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मालवाहतूकदारांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. शिवाय वाहनांची तासंतास अडवणूक करून त्यांना रखडवून ठेवले जात असल्याचा आरोप करीत मनसेच्या हवाई कामगार सेनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. कार्गो संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार अडविण्यात आले. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. सहार पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलकांना शांत केले.
मनसेच्या या आंदोलनानंतर मुंबई विमानतळ प्रशासनातर्फे अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. २०१९ पासून कार्गो संकुलातील पार्किंग किंवा अन्य शुल्कात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. भागधारक आणि वापरकर्त्यांना इष्टतम दरात सर्वोत्तम सेवा-सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. सर्व वापरकर्ते आणि भागधारकांशी चर्चा केल्यानंतर, जून २०२१ पासून कार्गो कर्मचाऱ्यांच्या युनियनची वाहने, वाहतूकदार आणि चार चाकी वाहनांना अनुदानित दर देण्याचे मान्य करण्यात आले. या निर्णयाचे कार्गोमधील कामगार व वाहतूकदार संघटनांकडून स्वागत होत आहे.