'महाराष्ट्रातील एकही उद्योग बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 06:45 AM2020-11-27T06:45:55+5:302020-11-27T09:17:51+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज्याच्या विकासाचा रोड मॅप समोर मांडला. शेतकरी आणि कष्टकरी हेच विकासाचे केंद्रबिंदू राहतील. हे आपलं सरकार त्यांच्या हितासाठीच राबवले जाईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

'No industry in Maharashtra will go out, employment opportunities will increase', uddhav thackeray samana enterview | 'महाराष्ट्रातील एकही उद्योग बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील'

'महाराष्ट्रातील एकही उद्योग बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील'

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज्याच्या विकासाचा रोड मॅप समोर मांडला. शेतकरी आणि कष्टकरी हेच विकासाचे केंद्रबिंदू राहतील. हे आपलं सरकार त्यांच्या हितासाठीच राबवले जाईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत सामनातून वाचकांच्या भेटीला आली आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत, त्यात राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारत असताना उद्धव ठाकरेही जशास तसं उत्तर देताना पाहायला मिळत आहे.  सामना वर्तमानपत्रात या मुलाखतीचे तिन्ही भाग प्रसारीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाला चांगलाच इशारा दिलाय. तसेच, राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनता हेच या सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसेच, राज्यात रोजगाराच्या संधी वाढतील, असे विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज्याच्या विकासाचा रोड मॅप समोर मांडला. शेतकरी आणि कष्टकरी हेच विकासाचे केंद्रबिंदू राहतील. हे आपलं सरकार त्यांच्या हितासाठीच राबवले जाईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील एकही उद्योग आता राज्याच्या बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील. एमआयडीसींची अवस्था चांगली नाही, त्यात सुधारणा होईल हा शब्द उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून दिला. तसेच, नाईट लाईफ म्हणजे फक्त मौजमजा छंद फंद नाहीत, श्रमणाऱ्या मुंबईची ती गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. 

मुंबईतील काही पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. त्यात बरीच गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत सोडवावी लागेल आणि त्याच्यात गुंतवणूक आणावी लागेल. त्याही दृष्टीने काही आर्थिस संस्थांनी तयारी दर्शवली आहे. पण, इथे काही गोष्टी आम्हाला सोप्या करुन द्या, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याच्यात जो सर्वसामान्य मुंबईकर आहे, जो पुनर्विकासाच्या प्रकल्पात अडकला आहे, घरं देऊन बसलेला आहे. त्याच्या इमारती पाडल्या गेलेल्या आहेत. टान्झिस्ट कॅम्पमध्ये राहतोय... त्याला हक्काची घरं नाहीयेत. त्यांना लवकरात लवकर हक्काच्या घरात नेणं हे मी ठरवलंय, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही तळमळीने मत मांडताना, लोकमान्य टिळक आणि प्रबोधनकार ठाकरें यांची उदाहरणे दिली. 

सरकार ५ वर्षे पूर्ण करेल

सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांनी अकरा दिवसांत सरकार पडणार असे भाकितं अनेकांनी केली होती, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना तसं बोलणाऱ्यांचे दात पडत आलेत, आता हे सरकार नक्कीच ५ वर्षे पूर्ण करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, सामनाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग नमस्कार घालतो, सर्वांच्या सहकार्यामुळेच, एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे. ''सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सहकार्याची भूमिका घेतली, त्यांच्याही मनात असं होत की चला आता वातावरण मोकळं झालं, चांगलं झालं. चला आता कामाला लागूया! हे जे काही सहकार्य करत आहेत ते महत्त्वाचं आहे. संपूर्ण राज्यातली प्रशासन यंत्रणा आहे. पोलीस आहेत, महसूल विभाग आहे. सगळ्यांचच सहकार्य लाभतंय, म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं आणि मला विश्वास आहे की, पुढची चार वर्षेही नक्कीच आम्ही पार करुच करू...'' असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारच्या कामगिरीवर आणि पुढील चार वर्षे महाविकास आघाडी सरकार सहजपणे पूर्ण करणार असल्याचं भाकित केलंय.   

मी संयमी आहे, पण याचा अर्थ नामर्द नाही

ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला इशारा दिलाय. हिंदुत्त्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे, आणि तुम्ही कुटुंबावर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदुळ नाहीत, तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर शाब्दीक हल्ले करणाऱ्या आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला उत्तर दिलंय. 

भाजपला इशारा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावरुनच उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे ठणकावले आहेत.  तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात, तेव्हा अशी वेसण घालावीच लागेल. ईडी काय, सीबीआय काय, त्यावर राज्याचा अधिकार नाही? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे, पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायचं का?. मग जनतेनं आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा दमच उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना भरला आहे. 

दरम्यान, संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार...आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू? ज्यांना ज्यांना मुलबाळं आहेत, त्यांनी आरशात बघावं, तुम्हालाही मुलबाळं आहेत, तुम्हालाही कुटुंब आहेत, तुम्हीही धुतल्या तांदळासारखे नाही, जर मी मागे लागलो तर मग...अशा गंभीर इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.(CM Uddhav Thackrey Interview with Sanjay Raut)
तसेच या प्रोमोत संजय राऊत यांनी राज्यात वाढीव वीजबिलावरून सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे मुलाखतीत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मागील काही दिवसापासून राज्यात वीजबिलावरून रणकंदन माजलं आहे. भाजपाने वीजबिल होळी आंदोलन केले तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीजबिलाच्या मुद्द्यावर राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढले त्यामुळे वीजिबिलाच्या या घटनेवर उद्धव ठाकरे काय सांगतात आणि भाजपा-मनसेवर काय भाष्य करतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

पहिल्या प्रोमोमध्ये काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण होत आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या अभिनंदन मुलाखतीचा प्रोमो पोस्ट करताना राऊत यांनी उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. ४४ सेकंदांचा हा प्रोमो आहे. मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ''ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन'' हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा दिला होता.

आडवं करायचं असेल तर बोलता कशाला? – भाजपा प्रदेशाध्यक्ष

दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंचे भाषण असचं झालं, शेण, गोमुत्र, आडवे करू, तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्र्यांना न शोभणारी आहे, सर्वसामान्य जनतेलाही हे योग्य नाही कळतं, आडवं-तिडवं करायचं असेल तर बोलता कशाला? गरजेल तो पडेल काय? त्यामुळे जे काही त्यांना वाटतं करावं ते करून टाकावं असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये

बायका, मुलं आम्हाला पण आहे, म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये, राज्याच्या सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावी, दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा भाजपाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
 

Web Title: 'No industry in Maharashtra will go out, employment opportunities will increase', uddhav thackeray samana enterview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.