मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य असून यापुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही. उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ उद्योगपतींच्या बैठकीत दिली.सीआयआयच्या सहकार्याने सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. या वेळी प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्र, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया, दीपक पारेख, पिरोजशा गोदरेज, भविन तुराखिया या मान्यवर उद्योजकांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या तसेच नवीन शासनाला उद्योगाच्या भरभराटीसाठी सूचनाही केल्या.या वेळी उपस्थित उद्योजकांनी महाराष्ट्रातील औद्योगिक वातावरण अनुकूल असून नवीन शासनाकडून उद्योगांच्या समस्यांचे अधिक गतीने निराकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजय मेहता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.>शेती, शिक्षण, रोजगारात योगदान हवेमुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की, आमचे सरकार हे कुठल्याही विकासकामांना स्थगिती देणार नसून उलटपक्षी महत्त्वाचे प्रकल्प अधिकाधिक जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे सरकार केवळ आमचे नसून तुमचे सगळ्यांचे आहे आणि त्यामुळे शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी उद्योजकांनी मोठे योगदान द्यावे.गेल्या काही वर्षांमध्ये काही कारणांमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले असतील, परंतु आता एकही उद्योग बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे बाहेरील राज्यांमधील चांगले उद्योगदेखील महाराष्ट्रामध्ये कसे सुरू होतील यासाठी त्यांना आकृष्ट करण्यात येईल. जमिनीची किंमत, वीजदर, रस्त्यांची तसेच इतर पायाभूत सुविधांची परिस्थिती आणि विविध परवानग्या गतीने मिळणे यासंदर्भात उद्योग विभागाला तसेच संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश देण्यात येऊन त्याप्रमाणे अडचणी दूर करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री या वेळी म्हणाले की, मुंबईसह संपूर्ण राज्यात पर्यटनाला अधिक गती देण्यात येऊन राज्यातील शहरांची एक चांगली ओळख करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रात दर्जेदार बदल घडविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून विशेषत: पालिकांच्या शाळांमध्ये उत्तम आणि तंत्रज्ञानयुक्त शिक्षण सहज सोप्या पद्धतीने मिळावे, टेलिमेडिसिनसारख्या यंत्रणेच्या उपयोगातून दुर्गम भागामध्ये चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी उद्योजकांची मदत घेतली जाईल.>आदित्य यांनी केले नाइट लाइफचे सूतोवाचमुंबईतील रस्ते, पदपथ यांची अवस्था सुधारून त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येत असल्याची माहिती दिली. अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना शहरात राबविण्यात येणार असून ६६ हरित ठिकाणे विकसित करण्यात येतील. घनकचरा व्यवस्थापनावर देखील अधिक भर देण्यात येत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरी सुविधांविषयक तक्रारींची तातडीने दखल घेण्यात येत आहे असे सांगितले. या वेळी त्यांनी नाइट लाइफ धोरण, पर्यावरण, इलेक्ट्रिक वाहने आदी विविध विषयांवर प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले.>उद्योगांकडून सूचनांचा वर्षावउद्योगांना विविध परवानग्या अधिक गतीने मिळाव्यात, वीज दरामध्ये अधिक सवलत मिळावी, उद्योगांच्या वाढीसाठी अधिक धाडसी निर्णय घ्यावेत, तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून घ्यावा, मुंबईला आर्थिक केंद्र व्हावे, मोठ्या उद्योगांबरोबर छोट्या उद्योग व्यवसायांचाही विकास व्हावा, परवडणारी घरे योजना अधिक योग्य पद्धतीने राबवावी, कृषी क्षेत्राचा विकास करताना पशुसंवर्धन उद्योग वाढीस लावावा, नवीन औद्योगिक वसाहती निर्माण कराव्यात, विशेष आर्थिक क्षेत्रे स्थापन करावीत, विशेष प्रकल्प वहनाद्धारे विविध प्रकल्पांना गती द्यावी, पर्यटन उद्योग वाढीस लावावा अशा विविध सूचना केल्या. सीआयआयतर्फे उदय कोटक यांनी आभार मानले. याप्रसंगी कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे हेही उपस्थित होते.
एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:25 AM