बॉम्बस्फोटाची माहितीच नाही; प्रज्ञासिंहचे कोर्टाला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:45 AM2019-06-08T03:45:39+5:302019-06-08T03:45:54+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट; वकीलच बोलत असतील, तर मला का बोलावले, असा केला सवाल
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी व भोपाळची भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिने अखेर शुक्रवारी विशेष न्यायालयात हजेरी लावली. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची काही माहिती आहे का? या न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रज्ञासिंहने आपल्याला या बॉम्बस्फोटाची माहिती नसल्याचे उत्तर दिले.
प्रज्ञासिंहने खटल्यास गैरहजर राहण्याची मुभा मिळावी, यासाठी सोमवारी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्या. व्ही. एस. पडाळकर यांनी तिचा अर्ज नामंजूर केला. पुढील सुनावणीस आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही, तर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच न्या. पडाळकर यांनी दिली. त्यामुळे शुक्रवारी प्रज्ञासिंहला न्यायालयात उपस्थित राहावेच लागले.
सुनावणीला हजर राहण्यास प्रज्ञासिंहला विलंब झाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘न्यायालयाने आरोपीची वाट पाहायची का?’ असा संतप्त सवाल न्यायालयाने प्रज्ञासिंहच्या वकिलांना केला. त्यावर त्यांनी प्रज्ञासिंह मुंबई विमानतळावर पोहोचली असून वाहतूककोंडीमुळे तिला न्यायालय गाठण्यास विलंब होत आहे, असे सांगितले. त्यानंतर दोन व्यक्तींचा आधार घेत प्रज्ञासिंहने न्यायालयात प्रवेश केला. या वेळी न्यायालयात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी व अजय राहीरकर हेही उपस्थित होते.
आरोपींनी आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात उपस्थित राहावे, असा आदेश गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने दिला. तो आदेश न्यायाधीशांनी आरोपींना वाचून दाखविला. न्यायालयाने आतापर्यंत ११६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे. त्यात डॉक्टर व पंच साक्षीदारांचा समावेश आहे, असेही न्यायालयाने आरोपींना सांगितले. त्यानंतर न्या. पडाळकर यांनी प्रज्ञासिंह आणि सहआरोपी सुधाकर द्विवेदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बोलविले.
काही साक्षीदारांनी न्यायालयात दिलेल्या साक्ष वाचत असताना न्या. पडाळकर यांनी प्रज्ञासिंहकडे विचारणा केली की, उत्तर महाराष्ट्रात सप्टेंबर २००८ मध्ये बॉम्बस्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाल्याची तुम्हाला माहिती आहे का? त्यावर प्रज्ञासिंहने उत्तर दिले की, ‘मुझे जानकारी नही है’ (मला याबाबत माहिती नाही), असेच उत्तर सुधाकर द्विवेदी याने न्यायालयाला दिले. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रज्ञासिंहने कोर्टाची पायरी चढली. मात्र, त्यापूर्वी दोनदा न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा मिळावी, यासाठी अर्ज केला. परंतु, दोन्ही वेळा न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. त्यापूर्वी आॅक्टोबर २०१८ मध्ये ती न्यायालयात उपस्थित राहिली. त्या वेळी आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले. उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये तिचा जामीन अर्ज मंजूर केला.
प्रज्ञासिंहसह अन्य आरोपींवर बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायद्यातील कलम १६ (दहशतवादी कृत्य करणे) आणि १८ (दहशतवादी कृत्याचा कट रचणे) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. त्याशिवाय भारतीय दंडसंहिता १२० (बी) (फौजदारी कट रचणे), ३०२ (हत्या), ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न करणे), ३२४ (जाणूनबुजून दुखापत पोहोचवणे), १५३ (ए) (दोन धर्मांतील लोकांमध्ये जाणूनबुजून शत्रुता निर्माण करणे) इत्यादी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
कोर्टरूममध्ये हाय ड्रामा; बसण्याच्या जागेवरून थयथयाट
प्रज्ञासिंहला न्यायालयात आणल्यानंतर ती सलग चार तास न्यायालयात उभी होती. मोडकळीस आलेल्या खुर्च्या, धुळीने भरलेल्या खिडक्या, अशा वातावरणात मला रिअॅक्शन झाली तर जबाबदार कोण, असा सवाल तिने न्यायालयात उपस्थित असलेल्या तिच्या वकिलांना केला. न्यायाधीश त्यांच्या चेंबरमध्ये असताना प्रज्ञासिंहने बसण्याच्या जागेवरून थयथयाट घातला.
मोडकळीला आलेल्या खुर्चीवर मी बसणार नाही. मी आजारी असतानाही मला बसण्यासाठी अशी जागा देण्यात येत आहे. मला बसण्याचा अधिकार आहे, असे सांगताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. अखेरीस तिच्या वकिलांनी तिची कशीबशी समजूत काढली व तिच्या खुर्चीवर भगवे वस्त्र अंथरले. त्यानंतर ती खुर्चीवर बसली.
माझी प्रकृती ठीक नसतानाही मला इथे बोलवण्यात आले आहे. मी येथे हजर असतानाही वकीलच बोलत आहेत, तर मग मला का बोलवले आहे? असा संतप्त सवाल प्रज्ञासिंहने तिच्या वकिलांना केला.