Breaking : ना खडसे, ना काकडे; राज्यसभेसाठी भाजपाचं तिसरं 'तिकीट' तिसऱ्याच नेत्याला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:30 PM2020-03-12T12:30:46+5:302020-03-12T12:33:06+5:30
राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून एका नावाची घोषणा करणे बाकी होते. त्यासाठी, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा होती.
मुंबई - या महिन्याच्या अखेरीस होत रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. आता, भाजपाने तिसरे नाव जाहीर केल्याने एकनाथ खडसे आणि सहयोगी खासदारसंजय काकडेंच्या नावाला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपाकडून डॉ. भागवत कराड यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून एका नावाची घोषणा करणे बाकी होते. त्यासाठी, भाजपाचे सहयोगी खासदारसंजय काकडे आणि एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा होती. एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा नाथाभाऊंना दिल्लीत पाठवणार अशी चर्चा होती. मात्र, ना काकडे, ना खडसे असे म्हणत भाजपाने तिसराचा उमेदवार जाहीर केला आहे. मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले आहे.
सहा वर्षांची मुदत असणाऱ्या राज्यसभा खासदार पदासाठी भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. त्यातच महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळे खासदारकी मिळवण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. मात्र, कराड यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाल्यानंतर आता या चर्चांना फुलस्टॉप मिळाला आहे. दरम्यान, याशिवाय आसाममधून भुवनेश्वर कालीता, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज, झारखंडमधून दीपक प्रकाश, मध्यप्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानमधून राजेंद्र गेहलोत आणि मणिपूरमध्ये लिएसिम्बा महाराजा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.