Join us

मोदींच्या विरोधात नेतृत्व नाही, पवारांनी सूचवला आवश्यक पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 6:53 AM

शरद पवारांचा विरोधकांच्या एकतेवर भर

ठळक मुद्देकेंद्राने अगोदर जीएसटीचा थकीत निधी द्यावा. राज्याच्या तिजोरीत पैसा आल्यानंतरच व्हॅट कमी करण्यावर विचार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षातून कोण व्यक्ती पर्याय बनू शकते किंवा विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी करतील किंवा अन्य कोणी, हे महत्त्वाचे नाही. सद्य:स्थितीत विरोधकांनी एकत्र येणे जास्त आवश्यक आहे. या दृष्टीने संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्षांशी चर्चा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. पवार यांचे बुधवारी चार दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आगमन झाले.

विदर्भ दौऱ्यावर आलो असल्याने येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. तसेच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न असेल. विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्यावरही भर देण्यात येत आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे व प्रत्येक पक्षाला विविध क्षेत्रांमध्ये पक्ष संघटन बळकट करण्याचा अधिकार आहे, असे पवार म्हणाले. या पत्रकार परिषदेला खासदार प्रफुल्ल पटेल, माजी आमदार प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. राज्य शासनावर व्हॅट कमी करण्याचा दबाव असल्याच्या मुद्द्यावर विचारले असता, केंद्राने अगोदर जीएसटीचा थकीत निधी द्यावा. राज्याच्या तिजोरीत पैसा आल्यानंतरच व्हॅट कमी करण्यावर विचार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कंगनावर टीकामहात्मा गांधी यांच्या विचारांच्या आदर्शांवर जगातील अनेक देश चालतात. इतक्या मोठ्या व्यक्तीबाबत बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे व असे बोलणाऱ्यांकडे दुर्लक्षच करायला हवे, या शब्दांत पवारांनी कंगनावर टीका केली.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदी