Join us

लाइट नाही, पाणी नाही, मग कसे होणार पुनर्वसन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:06 AM

मुंबई : कुर्ला येथील प्रीमियर कम्पाउंडमध्ये बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारती बांधण्यात आल्या असल्या, तरी आजही येथील येथील इमारतीमधील ...

मुंबई : कुर्ला येथील प्रीमियर कम्पाउंडमध्ये बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारती बांधण्यात आल्या असल्या, तरी आजही येथील येथील इमारतीमधील गाळ्यांचे दरवाजे, खिडक्या, विद्युत, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, उदवाहक, रंगरंगोटी व इतर कामे करण्यात आलेली नाहीत. मात्र, येथे बाधितांच्या पुनर्वसनासाठीच्या चाव्या देण्यात येत आहेत. आता जर का येथील अपूर्ण अवस्थेत असलेल्या घरांत नागरिक वास्तव्य करण्यास गेले आणि एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे.

कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदी लगतच्या क्रांतिनगर, संदेशनगर, जरीमरी आणि बामणडायापाडा येथील बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन कुर्ला येथील प्रिमियर कम्पाउंडमध्ये त्वरित करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी १ वाजता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात लोकप्रतिनिधी उपोषणास बसले होते. यावेळी क्रांतिनगर आणि संदेशनगर येथील ९३ पात्र झोपडीधारक लाभार्थ्यांना चाव्या देऊनही अद्यापही त्यांचे पुनर्वसन प्रीमिअर येथील कुर्ला कम्पाउंडमधील इमारत क्रमांक २ मधील विंग एफमध्ये प्रत्यक्ष पुनर्वसन करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

७ जून, २०१९ साली एचडीआयएल आणि एमआयएएल यांच्या आढावा बैठकीत एमआयएएलला २ मार्च, २०१९ रोजी हस्तांतरित केलेल्या ९३ पैकी ५ सदनिका संदेशनगर आणि ८८ सदनिका क्रांतिनगर येथील झोपडपट्टी रहिवाशांना वितरित करण्यासाठी सोडत काढावी. एमआयएएलने या ९३ सदनिकांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून लाभार्थींना कायमस्वरूपी घरांचा ताबा देण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्राधिकरणाकडून पाठपुरवा करण्यात आल्यानंतरही एमआयएएलकडून ९३ सदनिकांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. येथील इमारतीमधील गाळ्यांचे दरवाजे, खिडक्या, विद्युत, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, उदवाहक, रंगरंगोटी व इतर कामे करण्यात आलेली नाहीत.

मात्र, या इमारतीमधील गाळे हे जसे आहेत, तशा स्थितीत ९३ सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात यावे, असे म्हणणे लोकप्रतिनिधींनी मांडले. यावर या भूमिकेमुळे ९३ पैकी ६६ झोपडीधारकांना जसे आहे, तशा स्वरूपात सदनिकांच्या चाव्या २६ फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना देण्यात आल्या. आता सदर इमारतीची बाह्य आणि अंतर्गत दुरुस्तीची काम करणे आवश्यक असताना, या सदनिका राहण्यास अयोग्य आहेत. त्यामुळे योग्य दुरुस्ती होईपर्यंत या इमारतीमधील सदनिकांमध्ये वास्तव्य करू नये. इमारतीमध्ये वास्तव्य केल्यास येथे कोणता अनुचित प्रकार घडला, तर आपण सर्वस्वी जबाबदार असाल, असे पत्र एसआरएने ९३ सदनिकाधारकांना दिले आहे.