एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 05:59 AM2018-07-17T05:59:06+5:302018-07-17T05:59:36+5:30
प्रवाशांच्या पसंतीस पात्र ठरत असलेली वातानुकूलित लोकल सोमवारी मुंबईकरांच्या चर्चेचा विषय ठरली.
मुंबई : प्रवाशांच्या पसंतीस पात्र ठरत असलेली वातानुकूलित लोकल सोमवारी मुंबईकरांच्या चर्चेचा विषय ठरली. चर्चगेट-विरार एसी लोकलचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. परिणामी, दादर स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना वांद्रे स्थानकातून पायपीट करत, आपला प्रवास पूर्ण करावा लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
चर्चगेट येथून सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी विरारला जाणारी एसी लोकल रवाना झाली. सुमारे ९ वाजून १० मिनिटांनी लोकल दादर स्थानकात आली. या वेळी दादर स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर दुसºया क्रमांकाच्या बोगीचे स्वयंचलित दरवाजे उघडले नाही. तथापि, दरवाजे उघडण्याची आणि बंद होण्याचे अलार्म यंत्रणा सुरू होती. मात्र, दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना प्रवास करता आला नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
‘या लोकलमधून दादर-बोरीवली असा मी रोज प्रवास करते. सोमवारीदेखील नेहमी प्रमाणे लोकलसाठी उभे होते. लोकल फलाटावर आली. मात्र, लोकलचे दरवाजे उघडले नाही. अलार्म सुरू असल्याने दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. अखेर एसी लोकल डोळ्यासमोरून समोरून निघून गेली. फलाटावरील काही प्रवाशांनी दादर स्थानकातील स्टेशन व्यवस्थापकाला याबाबत विचारण केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही,’ असे दादर येथील दिव्या वाणी या तरुणीने सांगितले.
गेल्या वर्षी नाताळच्या मुहूर्तावर एसी लोकल सुरू करण्यात आली. एसी लोकलचे तिकीट दर सामान्य दरांच्या १.२ पट अधिक आहे. एसी लोकलच्या १२ फेºया रोज होतात. एका एसी लोकलमधून सुमारे १ हजार ३३६ प्रवासी प्रवास करतात. मे २०१८मध्ये एसी लोकलने सहा लाखांपेक्षा जास्त कमाई केली
होती.
>यापूर्वीही झाला होता तांत्रिक बिघाड
जून २०१८ मध्ये एसी लोकलच्या तीन बोगीतील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याची घटना घडली होती. सकाळी गर्दीच्या वेळी चर्चगेटला जाणाºया एसी लोकलमधील एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांनी चैन खेचून लोकल थांबविली होती. या बिघाडामुळे संपूर्ण दिवसभरातील लोकल फेºया रद्द करण्यात आल्या होत्या.
>पुढील स्टेशनवर दरवाजे उघडले
एसी लोकलच्या तांत्रिक बिघाडावर पश्चिम रेल्वेशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, विरार दिशेला जाणाºया एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे दरवाजे उघडले नाहीत. मात्र, पुढील स्थानकावर दरवाजे पुन्हा पूर्ववत काम करू लागले. यामुळे वातानुकूलित लोकलच्या पुढील फेºया रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.