लहान बालकांसाठी स्वदेशी लस निर्मितीला प्रोत्साहन द्यावे
कोरोनाचा फार मोठा प्रभाव लहान बालकांवर दिसून येतोय. सध्या शाळा बंद असल्याने तितका प्रभाव जरी दिसत नसला तरी शाळा व महाविद्यालये ही महत्त्वाची हाॅटस्पाॅट आहेत. विद्यार्थ्यांच्या जिवाच्या दृष्टीने लसीकरणाशिवाय पर्याय नाही, जरी इतर उपाय असले तरी ते तात्पुरते आहेत. मुळात लहान बालकांवर लस निर्मिती झाली पाहिजे. कारण बालके एकमेकांमध्ये जास्त मिसळत असतात व त्यांच्याकडे स्वयंशिस्तीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे याबाबत संशोधनासाठी आवाहन करावे!! शासनाने स्थानिक प्रशासनाला शाळा व महाविद्यालये यांना कोरोना विरोधात लढण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले असतानाही मदत तर दूरच राहिली, अक्षरशः शाळांवर दंडात्मक कारवाई पालिकेने केली. कोणत्याही परिस्थितीत दहावी ते बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेऊ नयेत!! मुंबई तसेच शहरी भागात नेमके काय होईल? हे सांगता येत नाही.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना
शिक्षण सुरू राहण्यासाठी लक्ष द्यायला हवे
लॉकडाऊन लागले किंवा नाही लागले तरी शाळा या आणखी काही महिने बंदच राहणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाचा विकास जिथे होतो ते शिक्षण सुरू राहण्यासाठी लक्ष द्यायला हवे. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट असल्याने तातडीने मोठ्या प्रमाणावर इयत्तानिहाय स्वाध्याय पुस्तिका यांची छपाई करून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत त्या पोहोचविणे व शिक्षकांनी अधूनमधून जाऊन त्या सोडवायला मदत करणे असा मार्ग घ्यायला हवा. त्याचप्रमाणे शाळेच्या परिसरातील वस्त्यांमध्ये पाच ते दहा विद्यार्थी एकत्र करून अध्यापन करणे सुरू ठेवायला हवे. मागील वर्षी लॉकडाऊन झाल्यावर सर्वात मोठा फटका हा किराणा दुकान, हॉटेल छोटे उद्योग, वीटभट्टी, मोलकरणी घरेलू कामगार यातील कामगारांना बसला. त्यांना पगार दिले गेले नाहीत यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले घरेलू महामंडळ सक्रिय करायला हवे. त्यात मोठी तरतूद करून हॉटेल दुकान मालक, वीट भट्टी मालक यांच्याकडून काही रक्कम घ्यावी व त्यातून असंघटित व छोट्या कामगारांना मजुरांना, घरेलू कामगार, मोलकरणी यांना शासनाने मदत करायला हवी.
- हेरंब कुलकर्णी, शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
गर्दीच्या वेळेत कडक निर्बंध हवे ....
कोरोनामुळे सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे तिचा आधार घेऊन राजकारण करणे बंद केले पाहिजे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या सगळ्यांचे मनोबल कसे उंचावेल यासाठी प्रयत्न करावे. या परिस्थितीचा फायदा घेऊन वैद्यकीय क्षेत्र अथवा कोणत्याही क्षेत्रामधील लोकांनी काळाबाजार केल्यास त्यावर कडक कारवाई केली पाहिजे. रात्रीचा लॉकडाऊन करून उपयोग होणार नाही, तर गर्दीच्या वेळेत केला पाहिजे तरच ही साखळी तुटण्यास मदत होईल.
- प्रकाश साळसिंगिकर, विशेष सरकारी वकील
कडक कारवाई करा...
संस्कृतमध्ये म्हण आहे, स्वभावो दुरतिक्रम:। कितीही सांगा, काही लोक नाही म्हणजे नाही , नीट मास्क लावणारच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जेणेकरून कारवाईमुळे तरी नियमांचे पालन होईल.
- प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक
अक्षरश: उपासमारीची वेळ येईल...
पुन्हा जर लॉकडाऊन लागलाच, तर कलाकारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ येईल. कारण गेल्या वर्षापासून आधीच खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता कुठे थोडीफार शूटिंग्स सुरू होत आहेत. मालिकाक्षेत्राची शूटिंगच सध्या व्यवस्थित चालू आहेत. चित्रपटांची शूटिंग्स अजूनही नीट सुरू झालेली नाहीत. चित्रपटाचे शूटिंग ३०-३५ जणांमध्ये करता येत नाही; त्याला कमीतकमी ६०-६५ लोक लागतात. त्यामुळे सध्या चित्रपटाचे काही सीन्सच केवळ शूट केले जात आहेत. चित्रपटाचे शूटिंग एकदाच केले जाते; त्यामुळे लोक कमी करून आम्हाला शूटिंग करणे शक्य नसते. अशातच जर लॉकडाऊन लागला तर कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचारी यांच्यावर खरोखरच उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. हे जरी खरे असले, तरी दुसरीकडे कोरोनाचा संसर्गही खूप वाढला आहे. त्याबाबत सरकारातील तज्ज्ञ लोक, डॉक्टर्स योग्य तो निर्णय घेतीलच. मात्र, निर्बंध चालतील; पण लॉकडाऊन नको असे मला वाटते.
- विजय पाटकर अभिनेते
मात करायची आहे
कोरोनाबाबतची स्थिती आपण सर्वजण अनुभवतोच आहोत. सगळीकडे खूप वाईट परिस्थिती असल्याचे जाणवत आहे. आमच्या बिंबिसार नगरमध्येही रोज कोरोनाबाधित काही व्यक्ती सापडत आहेत. आमच्या शूटिंगच्या ठिकाणीही काही लोक सापडत आहेत. माझ्या एका चित्रपटाचे शूटिंगही त्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. बाहेर जरी अशी स्थिती असली, तरी आपण सर्वांनी त्यावर मात करायची आहे. सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय हे पाळायलाच हवेत. पण एकंदर स्थितीवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊन केल्यास आमच्या क्षेत्रात खूप वाईट परिस्थिती निर्माण होईल. सरकारने लॉकडाऊन करू नये, अशी माझी प्रांजळ विनंती आहे.
- जयवंत वाडकर, अभिनेते
‘टेस्टिंग लॅब’ अहवालातील संभ्रम टाळणे गरजेचे
‘कोरोना अहवालाबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम आहेत. एकाच व्यक्तीचे अहवाल दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह येतात. त्यामुळे आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह याबाबत संबंधित व्यक्तींमध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यानुसार राज्य सरकारने ''टेस्टिंग लॅब''ची विश्वासार्हता पडताळावी. तसेच खासगी लॅबमध्ये असलेली दोन-दोन दिवसांची वेटिंग टाळण्यासाठी सरकारी ''टेस्टिंग फॅसिलिटी'' घरपोच मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व ऑफिससाठी कोरोना काळात ठोस नियमावली जाहीर करावी. जेणे करून त्या ठिकाणी होणारे गैरप्रकार टाळता येतील.
- रमेश चव्हाण, व्यावसायिक
कोरोना व्हर्सेस ‘माझी रोगप्रतिकार’ क्षमता
‘केंद्र आणि राज्य सरकार त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळत आहेतच. मात्र, नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करीत योगा, व्यायाम यासारख्या गोष्टींवर भर देऊन स्वतःला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. कारण कोरोनाची घातकता ही प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे ती वाढविणे हे प्रत्येकाच्या हातात आहे त्यानुसार नागरिकांनी त्यावर भर देणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोनाच काय, तर आपल्याला कोणत्याही व्हायरसशी सहज दोन हात करता येतील.
- संजय मोदी, प्लेटलेट्स डोनर
निर्बंधांचे कटाक्षाने पालन व्हायला हवे
लॉकडाऊन नकोच. कोरोना निर्बंधांचे कटाक्षाने पालन व्हायला हवे. त्यासाठी व्यवस्था उभारावी. सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी यांच्या मदतीने कारवाईची धार तीव्र करावी. गेल्या लॉकडाऊनच्या काळात बहुतांश कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’साठी आवश्यक सुविधा उभ्या केल्या होत्या. त्यांना ती व्यवस्था कायम सुरू ठेवण्याची सूचना करावी. कामाच्या वेळा बदलाव्यात, जेणेकरून लोकलमधील गर्दी कमी होईल. बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य घ्यावे. सद्य:स्थितीत ते पूर्ण सहकार्य करतील. भाजीविक्रेते फेरीवाल्यांना मोकळ्या मैदानात जाण्याची सक्ती करावी, ऐकत नसल्यास कठोर कारवाई करावी.
- सुधाकर अपराज, विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट
निर्बंध कठोर करण्याशिवाय पर्याय नाही
नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे निर्बंध कठोर करण्याशिवाय पर्याय नाही. बाजारपेठा, बसगाड्या, रेल्वेमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आरोग्यसुविधा आणखी वाढविण्यावर भर द्यायला हवा. शहरांच्या धर्तीवर ग्रामीण भागांतही आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रादुर्भाव अधिक असलेले प्रभाग शोधून अधिकाधिक चाचण्या कराव्यात. मास्कबाबत अजूनही काहीजणांना गांभीर्य नाही; त्यांच्यावर कडक कारवाई करावी. लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.
- अर्चना सबनीस, मुंबई ग्राहक पंचायत
नागरिकांनी मास्क घालणे अनिवार्य करा
नागरिकांच्या सहकार्याने कोरोना नियंत्रणात आणता येईल. नागरिकांनी शिस्त पाळून मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हात सतत धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क घालत नसलेल्या नागरिकांकडून पाच हजार रुपये दंड वसूल करावा आणि हे काम पालिकेऐवजी पोलिसांकडे सोपवावे.
आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेकारी वाढली आहे. संपूर्ण लॉकडाऊन हा परवडणारा नाही. तसेच संपूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण जास्त आहेत तो भाग सील करावा.
- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन
लॉकडाऊन लावले तर ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे काय होणार हा प्रश्नच आहे. मागच्या वेळी केंद्राने मदत केली म्हणून आपण काही तरलो. राज्य सरकारने त्यावेळी काहीच मदत केली नाही. वाऱ्यावर सोडले होते. आज पुन्हा परिस्थिती तशीच होते आहे. आता कुठे फेरीवाले किंवा हातावर पोट असणारे स्थिर होत होते; पण पुन्हा अडचण येत आहे. घरेलू कामगारांना आता अडचणी येतील. त्यांना सोसायट्या बंद होतील. त्यांची नोकरी जाईल. मात्र, अशा लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.
- सुभाष मराठे निमगावकर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना
लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. लोक शिस्त पाळत नाहीत. धार्मिक कार्यक्रम आयोजित करता कामा नयेत. कामगारांसाठी जी रुग्णालये आहेत ती सर्वसामान्यांसाठी खुली केली पाहिजेत. हे जनतेच्या उपयोगाला आले पाहिजेत. आवश्यक्ता असेल तर लॉकडाऊनचा विचार करावा. मुख्यमंंत्र्यांनी तज्ज्ञांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यावा.
- मिलिंद रानडे, प्रवक्ता, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया