Join us

काेविड केअर सेंटरमध्ये ना जेवणाची वेळ ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढल्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये शहरात कोविड सेंटर मध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढल्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये शहरात कोविड सेंटर मध्ये रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत कोविड केअर सेंटरची संख्यादेखील वाढविण्यात आली. मात्र, या कोविड केअर सेंटरमध्ये मिळणाऱ्या जेवणाबाबत उपचार घेऊन आलेल्या रुग्णांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. अनेक तक्रारी या जेवणाच्या वेळेबद्दल तर काही तक्रारी या जेवणाच्या दर्जाबाबत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी चांगल्या दर्जाचे जेवण मिळणे गरजेचे आहे. मात्र, काही कोविड केअर सेंटरमधील जेवणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे रुग्णांच्या तक्रारीवरून लक्षात येत आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये देखील कोविड केअर सेंटरच्या जेवणाबाबत नागरिक तक्रार करत होते. त्यावेळी जेवण पुरविणारा कंत्राटदार बदली करून त्या जागी दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा जेवणाबाबत रुग्ण तक्रारी करू लागले आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर - ३३६ या सेंटर्समध्ये दाखल रुग्ण - १३७५३

अ) बीकेसी कोविड सेंटर - याठिकाणी सकाळचा नाश्ता ९ वाजता तर जेवण १२.३० वाजता येते. जेवणाचा दर्जा ठीक असला तरीदेखील उपचार घेऊन आलेले रुग्ण जेवणाचा दर्जा वाढविण्याची मागणी करत आहेत.

ब) सेव्हन हिल्स कोविड सेंटर - याठिकाणी सकाळचा नाश्ता ८.३०, तर जेवण १२ वाजता मिळते. जेवणाचा दर्जा ठीक असल्याचे येथे उपचार झालेल्या रुग्णांचे म्हणणे आहे.

क) मुलुंड जंबो कोविड सेंटर - या ठिकाणी नाश्ता नऊ वाजता जेवण बारा वाजता मिळते. जेवणाचा दर्जा ठीक असला तरीदेखील येथील जीवनात मिळणाऱ्या चपाती व डाळ अधिक चांगल्या पद्धतीने बनवण्याची गरज असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

ड) गांधी रुग्णालय कोविड सेंटर - याठिकाणी सकाळचा नाश्ता ९ वाजता व दुपारचे जेवण १२ वाजता मिळते. जेवणाचा दर्जा ठीक असल्याचे येथील रुग्णांचे म्हणणे आहे.

मुंबईतील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये जेवण बऱ्यापैकी चांगले मिळत असले तरीदेखील जेवणाच्या दर्जामध्ये अधिक सुधारणा करण्याची गरज असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

रुग्णांकडून अनेक वेळेस जेवण अर्धवट टाकून दिले जाते तर काही वेळेस थेट घरून डबा मागविला जातो. यामुळे जेवणाचा दर्जा अजून सुधारण्याची गरज आहे.

कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना जेवण पुरवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येते. रुग्णांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास कंत्राटदार बदलण्यात येतो. रुग्णांना वेळच्या वेळी चांगले जेवण दिले जाईल याकडे कोविड केअर सेंटरच्या वतीने लक्ष देण्यात येते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.