Join us

सुशांत-रियामध्ये कोणताही मोठा आर्थिक व्यवहार झाला नाही, तपासानंतर ईडीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 4:33 AM

या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर विविध जणांकडे सलगपणे शेकडो तास केलेल्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत व त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांच्या बँक खात्यांमध्ये कोणताही मोठा आर्थिक व्यवहार झालेला नाही, असा निष्कर्ष सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काढला आहे. या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर विविध जणांकडे सलगपणे शेकडो तास केलेल्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.सुशांतच्या डेबिट, इंटरनेट बँकिंग आणि विविध प्रकारच्या कार्डांद्वारे कोणी खरेदी केली आहे का, याची चाचपणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या खात्यावरून १५ कोटी उकळल्याबद्दल बिहार पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर ईडीने आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हा दाखल करून रियासह सर्व संबंधितांकडे कसून चौकशी सुरू केली. गुरुवारी व शुक्रवारी सुशांतचा सेलिब्रिटी टॅलेंट व्यवस्थापक जयंती शाह, त्याचे वैयक्तिक कर्मचारी, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक यांच्याकडे चौकशी करून जबाब नोंदविले.आतापर्यंतच्या संपूर्ण तपासात सुशांत व रिया यांच्या बँक खात्यात कोणताही मोठा व्यवहार झाल्याचे समोर आले नाही. त्यामुळे सुशांतच्या बँक खात्यातून पैसे भरण्याची पद्धत तपासण्यासाठी सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहाराचा तपशील सध्या गोळा करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने १५ कोटींपैकी सुमारे २.७ कोटींचा आयकर भरला होता.>कंपन्यांबाबत चौकशीईडी सुशांतबरोबर रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी एकत्रित कंपन्या कशा बनवल्या याचा तपास करत आहे. रिया विविडेज रियालिटिक्स कंपनीची संचालक आहे, तर तिचा भाऊ शोविक फ्रंट इंडिया फॉर वर्ल्ड फाउंडेशनचा संचालक आहे. सुशांतही त्यांच्याबरोबर होता. ईडीने आतापर्यंत रिया, शोविक, तिचे वडील इंद्रजीत, सुशांतचे सीए संदीप श्रीधर, गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, रूममेट सिद्धार्थ पिठानी, रियाचे सीए रितेश शाह आणि सुशांतची बहीण मितू सिंग यांची चौकशी करून जबाब नोंदविले आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत