No Mask: रेल्वेतून विनामास्क प्रवास केल्यास प्रवाशांना ठोठावणार ५०० रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 06:43 AM2021-04-18T06:43:36+5:302021-04-18T06:43:54+5:30
CoronaVirus: सध्या संपूर्ण देशात ९० टक्के प्रवासी रेल्वे गाड्या धावत आहेत. अनेक जण विनामास्क रेल्वे प्रवास करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. आता रेल्वे प्रशासनानेही मोठे पाऊल उचलले असून, रेल्वेतून विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल.
सध्या संपूर्ण देशात ९० टक्के प्रवासी रेल्वे गाड्या धावत आहेत. अनेक जण विनामास्क रेल्वे प्रवास करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने देशभरातील सर्व झोनल रेल्वे कार्यालयांना विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ५०० रु. दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
रेल्वे परिसरात थुंकणेही पडणार महागात
रेल्वे परिसर आणि रेल्वेमध्ये गुटखा, पान मावा यांच्या पिचकाऱ्या पाहायला मिळतात. यामुळे रेल्वे आणि परिसर खराब होतोच शिवाय ते कोरोनाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे अशा व्यक्तींना धडा शिकविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या परिसरात किंवा रेल्वेमध्ये थुंकणाऱ्यांनाही आता ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.दरम्यान मध्य रेल्वेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवाशांना योग्य प्रकारे मास्क घालण्याचे, साबणाने/पाण्याने नियमितपणे हात धुण्याचे, सॅनिटायझर वापराचे आणि सोशल डिस्टंसिंग राखण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, रेल्वे तिकीट तपासणीस आता प्रवाशांच्या तिकिटाबरोबरच त्याने मास्क घातला आहे की नाही, हे सुद्धा तपासणार आहेत. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. हा आदेश पुढील सहा महिने लागू असेल.