भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील घराबाहेर पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. सोमय्या यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली असून सुद्धा मुंबई पोलीस दलाचा कडक बंदोबस्त सोमय्या यांच्या घराबाहेर आहे. किरीटी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यास मज्जाव करण्यासाठी ठाकरे सरकारबे हे कारस्थान केले असल्याचं सोमय्या यांनी आरोप केले आहे. मला गणेश विसर्जनासाठी देखील जाण्यास दिले जात नाही आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या अटकेसाठी डझनभर पोलीस घराबाहेर पाठवले आहेत असा देखील आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मला ठाकरे सरकारने कितीही पोलीस स्टेशन आणि जेलमध्ये डांबले तरी मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच. मी मुश्रीफ यांचा कोल्हापूर आणि अहमदनगर येथील साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढणारच तसेच अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याला देखील भेट देणार आहे. पवारांचे देखील घोटाळा लवकरच बाहेर काढणार. अनिल देशमुखांनंतर हसन मुश्रीफ यांना अटक होणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
ठाकरे सरकारची गुंडगिरी
मी सकाळी कोल्हापूरला जाणार होतो. त्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कागलला हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याचा घोटाळा उघड करणार होतो. पण मला कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ अन्वये नोटीस पाठवून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास बंदी घातली आहे. त्यावर ही नोटीस देण्यासाठी इतकी छावणी कशासाठी?, मला घराबाहेर पडू देत नाही आहे. ही ठाकरे सरकारची गुंडगिरी आहे. दिलीप वळसे पाटील यांची दादागिरी आहे.
मी मुलुंड निलम नगर येथून ५.३० ला निघून गिरगाव चौपाटी गणेश विसर्जनच्या इथे जाणार आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशनवरून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली