लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्याविहार येथील क. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी विभागाच्या मराठी प्रबोधन अंतर्गत भाषा पंधरवड्यानिमित्त अक्षर स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे स्नेहसंमेलन व्हर्च्युअलवर रंगतदार झाले. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले होते.
दरवर्षीप्रमाणे क. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा झाला. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही, परिस्थितीवर मात करीत, या आभासी माध्यमांचा वापर करून विविध साहित्यिक उपक्रम राबविताना, विद्यार्थीही तंत्रज्ञानामध्ये निपुण होतात. कोणतेही संकट आले तरी आपण थांबत नाही. त्यावर मात करून नवे पर्याय शोधतो. या अनुभवाची प्रचिती मराठी पंधरवड्याच्या निमित्ताने अधिक प्रबळ झाली. हे या भाषा पंधरवड्याचे फलित होय. महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मराठी विभागप्रमुख डॉ. वीणा सानेकर, मराठी प्रबोधनचे प्रमुख प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. मीरा कुलकर्णी, महाविद्यालयाच्या मराठी विभागातील निवृत्त शिक्षिका प्रा. संध्या खरे, प्रा. मुग्धा रिसबूड यावेळी उपस्थित होते.