मुंबई : महानगरपालिकेच्या इतिहासात आजवर कधीही आयुक्तपदी महिला अधिकारी विराजमान झाल्याचे उदाहरण नाही. पण, विद्यमान आयुक्त आय. एस. चहल हे सध्या रजेवर असल्याने किमान या कालावधीसाठी तरी अश्विनी भिडे यांच्याकडे कार्यभार असल्याने प्रभारी का होईना महानगरपालिकेला महिला आयुक्त लाभल्या आहेत.
सध्या अश्विनी भिडे या महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त असून त्यांच्याकडे कोस्टल रोड, रस्ते, पूल आदी महत्त्वाचे विषय आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने सुरू असलेल्या मेट्रो-३ या प्रकल्पाचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. धडाडीच्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. सध्या त्या आयुक्त म्हणून पालिका प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडील मेट्राेचा पदभार काढून घेतला गेला. मात्र शिंदे - फडणवीस सरकार येताच पुन्हा त्यांना मेट्राेचा पदभार देण्यात आला आणि आता त्या प्रभारी का असेना मुंबई महापालिकेच्या आयुक्त झाल्या.
आधी अनेकदा महापालिकेला महिला अधिकारी आयुक्त म्हणून मिळणार, अशी चर्चा झालेली आहे. पण, राज्य सरकारने तसा निर्णय कधी घेतला नाही. याआधी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत राहिलेल्या मनीषा म्हैसकर गतवर्षी जून अखेरीस नवे सरकार स्थापन झाले तेव्हा त्या आयुक्तपदी येतील, अशी चर्चा होती. पण, चहल यांना आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले. त्यामुळे मनीषा म्हैसकर यांच्या नावाची केवळ चर्चाच राहिली. अलीकडेच डॉ. अश्विनी जोशी यांचीही अतिरिक्त आयुक्त म्हणून पालिकेत नियुक्ती झाली आहे. आयुक्त पदाखालोखाल महत्त्वाच्या असलेल्या या पदांवर दोन महिला अधिकारी असण्याचा हाही एक योगायोगच.