डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कधीकाळी स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांसह राज्य पोलिसांना उत्कृष्ट तपासासाठी एकही पदक मिळालेले नाही.
गृहमंत्रालयाने २०२३ साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत. देशभरातून १४० अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळत असताना महाराष्ट्र पोलिसांचे अपयश धक्कादायक असल्याची चर्चा ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांत आहे. सर्वाधिक १५ पदके सीबीआयला व १२ राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश (१०) व केरळ (९) यांचा क्रमांक येतो.
राज्यनिहाय पदक
आंध्र प्रदेश ५, आसाम ४, बिहार ४, छत्तीसगढ ३, गुजरात ६, हरयाणा ३, झारखंड २, कर्नाटक ५, मध्य प्रदेश ७, ओडिशा ४, पंजाब २, राजस्थान ९, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्किम, त्रिपुरा, उत्तराखंड, चंडीगड प्रत्येकी १, तामिळनाडू ८, तेलंगणा ५, प. बंगाल ८, दिल्ली ४, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, लदाख, लक्षद्वीप, पुडुचेरी प्रत्येकी १.
तपास अधिकाऱ्यांनी केलेले काम संकलित करून केंद्रीय ग्रह विभागाकडे पाठवणे व त्याला मान्यता मिळेल, याची खात्री करणे हे पोलिस महासंचालक कार्यालयाचे कर्तव्य आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे याकडे संबंधितांचे पुरेसे लक्ष वेधले गेले नसल्याचे दिसून येते. - प्रवीण दीक्षित, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक.