मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला बरोबर न घेता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली, त्यामध्ये या निर्णयावर एकमत झाले आहे. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी झालेल्या 4 तासांच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांची रणनिती निश्चीत करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मनसेसोबत युती करण्यासंदर्भात मुंबईतील नेत्यांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. यासंदर्भात मतप्रदर्शन करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मनसेसोबत युती न करण्याचे स्पष्ट मत मांडले. त्यामध्ये, स्वत: लोढा, माजी मंत्री आशिष शेलार, खा. मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर यांसह सर्वांनी मनसेसोबत युती नकोच असा सूर व्यक्त केल्याची माहिती राजकीय सुत्रांनी दिली.
दरम्यान, मनसेसोबत गेल्यास आपण उगाच त्यांची ताकद वाढवू, मनसेसोबत युती ही बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. शिवाय हिंदी भाषिक मतंही भाजपची हक्काची व्होट बँक आहे. उद्या मनसे आपल्यासोबत असेल तर ही व्होट बँक बिचकेल, असे मत नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यानंतर, स्वबळावर लढण्यासाठी कंबर कसा, असे फडणवीसांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना सांगितले.
भाजप नेत्यांचा निर्धार
महापालिकेतील सत्तारूढ शिवसेनेला सत्तेतून बेदखल करुन महापालिकेत भाजपचे कमळ फुलविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आल्याचे भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगतिले. या बैठकीला देवेंद्र फणवीस यांच्यासह विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते.