Join us

मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:24 AM

ठाणे ते भायखळा यादरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासले, त्यात विशाल माटुंगा रेल्वे स्थानकात मध्यरात्री ते पहाटेपर्यंत कुठेच दिसले नाहीत.

मुंबई : विशाल पवार या पोलिसाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने कलाटणी घेतली आहे. पवार यांचा मृत्यूपूर्वीचा जबाब आणि सीसीटीव्ही तपास यांच्यात तफावत आढळली आहे. चोरी झालीच नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवार यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. दादर रेल्वे पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

ठाणे ते भायखळा यादरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासले, त्यात विशाल माटुंगा रेल्वे स्थानकात मध्यरात्री ते पहाटेपर्यंत कुठेच दिसले नाहीत. पवार २७ एप्रिल रोजी आठ वाजता घरातून बाहेर पडले. १०:५० ला ठाणे रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडली. त्यानंतर ११:५६ ला दादर स्थानकाबाहेर येताना दिसले. दादर भागातच वेगवेगळ्या सीसीटीव्हींत दिसून आले. त्यानंतर पुतण्याला शेवटचा कॉल करून मोबाइल बंद केला.  दुसऱ्या दिवशी ११ वाजता माटुंगा स्थानकातून लोकल पकडून १२ वाजता कोपरी येथील घराकडे जाताना ते सीसीटीव्हीत दिसतात. सीसीटीव्ही फूटेजनुसार त्यांनी चोरी झाल्याचा दावा केलेल्या मोबाइलवरून पुतण्याला कॉल केल्याचे समोर आले. त्यामुळे प्राथमिक तपासात चोरी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री उशिराने उलट्या होण्यास सुरुवात झाल्याने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोपरी पोलिसांनी सुरुवातीला कळवले नाही...

कोपरी पोलिसांनी विशाल यांचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदविल्यानंतर तत्काळ दादर रेल्वे पोलिसांना कळवून चौकशी केली नाही. थेट गुन्हा नोंदवत प्रकरण दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ केलेल्या चौकशीतून चोरी झालीच नसल्याचे समोर आले आहे.

चुकीच्या औषधाचे परिणाम?

उलट्या झाल्याने विशाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अँटी बायोटिक देण्यात आल्याचे समजते. चुकीच्या औषधामुळे त्यांचा मृत्यू झाला का, या दिशेनेही पोलिस तपास सुरू आहे.

मद्याची नशा?

घरातून ८ वाजता बाहेर पडल्यानंतर रात्री १०:५० ला ठाणे स्थानकातून ट्रेन पकडली. या दरम्यान ते कुठे होते? त्यांनी मद्याची नशा केल्याने कामाला न जाण्यासाठी ही थेअरी रचल्याचा संशय असून, दादर भागातील बारजवळील सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस