महापौरांवर मनसेने साधला निशाणा; नेटकऱ्यांनी केले ट्राेल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एक कोटी लसींच्या पुरवठ्याचे कॉन्ट्रॅक्ट नेमके कुणाला दिले, असा प्रश्ना नेटकऱ्याने करताच महापौरांनी ‘तुझ्या बापाला’ असे उत्तर दिले. त्यांच्या या आक्षेपार्ह उत्तरावर जोरदार टीका झाली. त्यानंतर, महापौरांनी या टि्वटचे खापर शिवसैनिक कार्यकर्त्यावर फोडले. मात्र, महापौरांच्या उत्तराला मनसे, इतर राजकीय पक्षांसह नेटकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत महापौरांवर निशाणा साधला. ‘आले अंगावर ढकलले कार्यकर्त्यांवर, ‘यापुढे माझा मोबाइल, माझी जबाबदारी’, अशी खोचक टिपणी देशपांडे यांनी केली, तर मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरांकडून सभ्य आणि सुसंस्कृत भाषेची अपेक्षा असते. किमान सार्वजनिक ठिकाणी तरी बोलण्याचे संकेत पाळायला हवेत, असे मत भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी मांडले.
नेटकऱ्यांनी महापौरांच्या खुलाशाची खिल्ली उडवली आहे. एकाने तर काळ खूप वाईट आला आहे. त्यामुळे आपला मोबाइलचा पासवर्ड उघडून, मोबाइल अनलाॅक करून तो कार्यकर्त्याच्या हातात देऊ नये, असा सल्ला देत महापौरांच्या दाव्यातील फोलपणा दाखवून दिला.
.............